सांगली - जिल्ह्यात भाजप-सेनेसमोर बंडखोरांचे आव्हान उभे राहिले आहे. ८ पैकी ४ मतदार संघात युतीला बंडखोरांशी सामना करावा लागणार आहे. सांगली, शिराळा, जत, आणि इस्लामपूर या विधानसभा मतदार संघात बंडखोरी झाली आहे. ३ मतदारसंघात भाजपची बंडखोरी, तर एका मतदार संघात सेनेची बंडखोरी झाली आहे. त्यामुळे युतीच्या उमेदवारांना बंडखोरांनाही टक्कर द्यावी लागणार आहे.
हे वाचलं का? - विधानसभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीचा 'शपथनामा' प्रसिद्ध
सोमवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख होती. यावेळी जत मतदारसंघात सत्ताधारी भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. याठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार विलासराव जगताप यांनी त्यांच्याविरोधात भाजपमधील ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी यांनी बंडखोरी केली आहे. आपला अर्ज कायम ठेवते त्यांनी जगतापांना आव्हान दिले आहे, तर इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँगेसचे विद्यमान आमदार जयंतराव पाटील यांच्याविरोधात शिवसेनेचे उमेदवार गौरव नाईकवाडी मैदानात आहेत. मात्र, याठिकाणी इस्लामपूर नगरपालिकेचे भाजप नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे सेनेचे उमेदवार गौरव नायकवडी यांना निशिकांत पाटलांची बंडखोरी डोकेदुखी ठरणार आहे.
शिराळा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासमोर राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे कडवे आव्हान आहे. भाजपकडे उमेदवारी मागणी करणारे युवा नेते सम्राट महाडिक यांनी बंडखोरी कायम ठेवत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. यामुळे याठिकाणी भाजपमधील ही बंडखोरी आमदार शिवाजीराव नाईक यांना धोक्याची ठरू शकते.
हे वाचलं का? - परळी विधानसभा : धनंजय मुंडेंकडून रोजगार निर्मिती, तर पंकजांचा सुरक्षेच्या मुद्द्यावर भर
सांगली मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांच्याविरोधात काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांचे आव्हान असताना याठिकाणी शिवसेनेतून बंडखोरी झाली आहे. सेनेचे नेते माजी नगरसेवक शेखर माने यांनी याठिकाणी बंडखोरी केली आहे.
एकूणच सांगली जिल्ह्यातील ८ मतदारसंघापैकी ४ मतदार संघात बंडखोरी झाली आहे. यामुळे युतीच्या उमेदवारांची या बंडखोर उमेदवारांमुळे डोकेदुखी वाढणार आहे .