सांगली - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने आज (मंगळवार) आंदोलन करण्यात आले आहे. सांगलीतील इस्लामपूर येथे माजी कृषी मंत्री आणि रयतचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली 'शेतकरी बचाव'चा नारा देत सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - फॅशनसोबत सेफ्टी, मॅचिंग मास्कची मागणी वाढली...
महाराष्ट्रातील शेतकरी अनेक संकटाचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटना आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलने व सरकारला पत्रव्यवहार करून शेतकऱ्यांच्या समस्या सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती व्यापक अशी बैठक राज्याचे मुख्यमंत्री किंवा कृषिमंत्री यांनी घेणे गरजेचे होते. मात्र, कोरोना आपत्तीपासून शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नसणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे, असा आरोप यावेळी सदाभाऊ खोत यांनी केल.
राज्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून शेतकरी प्रश्नावरती सरकारला वेळोवेळी जाणीव करून देण्याचे काम केलेले आहे. मात्र, सरकारकडून याची दखल घेण्यात येत नसल्याने आपत्तीच्या काळात नाईलाजाने राज्यातील इतर शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांना घेऊन रयत क्रांती संघटनेला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल आहे, असा इशारा यावेळी सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.