सांगली - मराठा ऑर्गनायजेशन महाराष्ट्र राज्य व हिरकणी ग्रुप आष्टा यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष संवर्धन व संरक्षणासाठी "भगिनी रक्षणम्" हा अभिनव रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
बहिणींप्रमाणे पर्यावरणाचेही रक्षण गरजेचे
'रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला ज्या विश्वासाने राखी बांधते त्याच ठाम विश्वासाने भाऊसुध्दा बहिणीला तिच आजन्म रक्षण करण्याचं वचन देत असतो. परंतु सध्या कोरोनाचा असणारा प्रभाव व प्राणवायूची भासणारी कमतरता लक्षात घेता वृक्ष संवर्धन होऊन त्यांचे संरक्षण होणं काळाची गरज आहे. हाच मुद्दा लक्षात घेऊन प्रत्येकाने स्वतःच्या बहिनीबरोबरच इतरांच्याही बहिनींचे रक्षण करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजीक बंधनांचे पालन करणे गरजेचे आहे. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या घटकांपासून निसर्गाची रक्षा केली पाहिजे. वृक्षारोपण केले तर आपला देश हरितमय होईल. यामुळे पर्यावरणाचे उत्तम संतुलन राखण्यास मदत होईल', असे मराठा ऑर्गनायजेशन महाराष्ट्र राज्यचे संपर्क प्रमुख अजय उत्तम शिंदे यांनी म्हटले.
राखी बांधून पर्यावरण रक्षणाचे वचन
हिरकणी ग्रुप आष्टाच्या भगिनींनी नैसर्गिक साहित्यांपासून बनवलेल्या राख्या मराठा ऑर्गनायझेनशनच्या भावांना बांधल्या. तर, भावांकडून बहिणीला एक वृक्ष भेट देण्यात आले. यातून दोघांनीही एकमेकांना सामाजिक बंधनांचे आणी पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण करण्याचे वचन दिले.
हिरकणी ग्रुप आष्टाच्या संस्थापिका सुनीताताई घोरपडे म्हणाल्या, की 'पर्यावरण संरक्षण संवर्धन करण्यासाठी आष्टा हिरकणी ग्रुप व मराठा ऑर्गनाइजेशन नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असते. आजचा हा पर्यावरण पुरक रक्षाबंधन देखील समाजाला एक नवी प्रेरणा देईल, हे नक्कीच'. दरम्यान, दोन्ही ग्रुपच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाची व वसुंधरा रक्षणासाठी समाजामध्ये प्रबोधन करण्याची शपथ घेण्यात आली.