सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने सॅनिटायझर आणि इतर साहित्यांचा अवैध साठा जप्त केला आहे. आत्तापर्यंत राज्यात 1 हजार 674 ठिकाणी छापे टाकून सुमारे 1 कोटी 14 लाखांचा साठा जप्त केल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व अन्न औषध राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे.
करोना विषाणू (Covid-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी यड्रावकर सांगली येथे आले होते. त्यांनी सांगली आणि मिरज येथील आयसोलेशन कक्षांना भेट देऊन पाहणी केली. आरोग्य यंत्रणांना आवश्यक सूचनाही त्यांनी दिल्या. रुग्णांना हातळण्यासाठी नियुक्त केलेल्या वैद्यकीय पथकाला कोणत्या सुविधा देण्यात आल्या आहेत, याचाही त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - 'राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 45 वर; पुणे, मुंबईसह रत्नागिरीतही आढळला रुग्ण
जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे असे त्यांनी सांगितले. कोरोना संसर्ग रोखण्यामध्ये जनतेने फार मोठे सहकार्य दिले असून, यापुढेही जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन यड्रावकर यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी सॅनिटायझर आणि इतर साहित्यांचा अनधिकृत साठाकरण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाकडून आत्तापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी केली. 1 हजार 674 ठिकाणी छापे टाकून तपासणी करण्यात आली आहे. यातील १५ ठिकाणांहून सुमारे 1 कोटी 14 लाखांचा अनधिकृत साठा जप्त केल्याची माहिती यड्रावकर यांनी दिली.