सांगली - वय झालेल्या अण्णांनी आता आपले उर्वरित आयुष्य आंदोलन, उपोषण न करता शांतपणाने जगावे, असा उपहासात्मक टोला शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी लगावला आहे. भाजपा नेत्यांकडून मनधरणी केल्यानंतर अण्णा हजारेंनी आपले उपोषण स्थगित केला आहे, त्यांनी अण्णा हजारे यांना खडे बोल सुनावले आहेत. ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलत होते.
भाजपाच्या नेत्यांकडून अण्णांची मनधरणी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र भाजपाच्या नेत्यांकडून अण्णांची मनधरणी करण्यात आली. त्यामुळे त्यांनी आपले उपोषण स्थगित केले. यावरून रघुनाथदादांनी अण्णांवर निशाणा साधला आहे. अण्णांनी आता आंदोलनाच्या भानगडीत पडू नये, असे ते म्हणाले.
'छोट्या-मोठ्या कुस्त्या करायच्या नसतात'
ते पुढे म्हणाले, की एकदा का पैलवानाने हिंदकेसरी पद मिळविले, की त्या पैलवानाने पुन्हा मैदानी किंवा छोट्या-मोठ्या कुस्त्या करायच्या नसतात. त्याप्रमाणे दिल्लीच्या रामलीला मैदानावर जागतिक पातळीवरील आंदोलन करून सरकारे बदलली. त्यामुळे आता अण्णा हजारेंनी आपले वय लक्षात घेऊन यापुढे आंदोलन, उपोषण न करता शांतपणे व आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात घालवावे.