सांगली - मॉब लिंचींगमध्ये मृत्युमुखी पडलेल्या तबरेज अन्सारी या युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ आज (बुधवार) सांगलीतील समस्त मुस्लिम समाज संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. हल्लेखोरांवर कडक कारवाई करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
झारखंडमध्ये चोरीच्या संशयातून ज मावाकडून तबरेज अन्सारी याची हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. तबरेज यास ‘जय श्रीराम, जय हनुमान’च्या घोषणा देण्यास बळजबरी करण्यात आली होती. जमावाने मारहाण करत त्याची हत्या केली होती. या घटनेचे संपूर्ण देशभरात संतप्त पडसाद उमटत आहेत.
सांगलीमध्ये समस्त मुस्लिम समाज संघटनेच्या वतीने या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. शहरातील स्टेशन चौक या ठिकाणी महात्मा गांधी पुतळ्यासमोर जिल्ह्यातील अनेक मुस्लीम संघटनांनी आंदोलनात सहभाग घेत निदर्शने केली. यावेळी हल्लेखोरांवर कडक कारवाई करत फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच तबरेज अन्सारीच्या कुटुंबियाला सरकारने अर्थिक मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.