सांगली - शासकीय रुग्णालयात एका गरोदर महिलेच्या प्रसूतीदरम्यान आईसह बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांनी उपचार करताना हलगर्जीपणा केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. श्रीदेवी उत्तम नरळे (वय-२५), असे मृत महिलेचे नाव आहे.
सांगलीच्या शासकीय रुग्णालयात बुधवारी दुपारच्या सुमारास श्रीदेवी नरळे या प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. यावेळी रुग्णालयाकडून श्रीदेवी यांच्या सर्व चाचण्या करून घेण्यात आल्या. यामध्ये महिलेची नैसर्गिक प्रसूती होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, सायंकाळनंतर महिलेची प्रकृती बिघडली. त्यावेळी डॉक्टरांनी बाळाच्या छातीचे ठोके वाढल्याने बाळासह आईच्या जीवालाही धोका होईल, असे सांगितले. त्यामुळे संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी गरोदर महिलेचे सिजर करून वाचवण्यास सांगितले. मात्र, अचानक रात्री दोनच्या सुमारास महिला आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
उपचारादरम्यान डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाल्याने महिलेचा आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.सकाळी संतप्त नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांवर कारवाईच्या मागणीसाठी रुग्णालयाच्या समोर ठिय्या आंदोलन केले. यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी महिलेचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची भूमिका घेतली आहे.