सांगली - काँग्रेसचे माजी मंत्री आणि वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. तर, त्यांचे धाकटे बंधू विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर करत काँग्रेसने तिकीट द्यावे अन्यथा, अपक्ष लढवू असा इशारा दिला आहे. सांगलीमध्ये पार पडलेल्या 'दादा प्रेमी गटा'च्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधून वसंतदादा घराला डावलण्यात येत असल्याचा आरोप करत आज 'दादा प्रेमी गटा'ने सांगलीमध्ये बैठक घेतली. बैठकीत सर्वच नेत्यांनी हक्काची सांगलीची जागा मित्रपक्षांना देऊ नये, अशी भूमिका मांडली. तर, माजी केंद्रीय राज्यमंत्री व वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
'दिल्लीत पक्ष नेतृत्वाची भेट मिळत नाही. ई-मेलवर आमच्या भावना कळवाव्या लागतात. आपण मंत्री झाल्यानंतरही राहुल गांधी यांची एकदाही भेट झाली नाही. त्यामुळे राहुल गांधींना वसंतदादा काय कळणार,' अशी खंत व्यक्त त्यांनी व्यक्त केली. 'सोनिया गांधी होत्या तोपर्यंत आपण काँग्रेसमध्ये होतो. आता त्याजबाबदारीतून निवृत्त झाल्या आहेत.' त्यामुळे आपण काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याचे प्रतीक पाटील यांनी जाहीर केले. 'काँग्रेसला आता वसंतदादा घराणे नको झाले आहे. तेव्हा आम्हाला ही काँग्रेस नको आहे. दादा घराण्याला सन्मानाची वागणूक दिली जात नाही. दादा घराणे संपवण्याचे काम काँग्रेसमध्ये सुरू असल्याचा आरोपही यावेळी प्रतीक पाटील यांनी केला. तसेच, आपण कोणत्याही पक्षात जाणार नसून यापुढे वसंतदादा पाटील हाच आपला पक्ष असेल,' अशी भूमिका प्रतीक पाटील यांनी स्पष्ट केली.