सांगली - जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षांपूर्वी गर्भ तपासणी करत गर्भपात करण्याचे केंद्र उघडकीस आले होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर प्रशासनाकडून विशेषतः आरोग्य विभागाच्या माध्यमातून गर्भ तपासण्या आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून कडक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
आरोग्य पंढरी म्हणून ओळख -
सांगली जिल्हा हा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील मिरज आणि सांगली शहरांमध्ये आरोग्याची मोठी व्यवस्था आहे. सांगली आणि मिरजेत असणाऱ्या शासकीय रुग्णालयांमध्ये महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक राज्यासह इतर राज्यातीलही गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे मिरज व सांगली नगरी ही महाराष्ट्रात आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाते.
2 वर्षात 2 बेकायदा गर्भपात अड्डे उद्धवस्त -
मात्र, आरोग्य पंढरी म्हणून ओळख असलेल्या या जिल्ह्यात गेल्या काही वर्षात आरोग्य पंढरीच्या नावाला काळीमा फासण्याचा उद्योग झाला. मिरज तालुक्यातील म्हैसाळ या ठिकाणी मार्च 2017मध्ये खिद्रापूरे हॉस्पिटल याठिकाणी गर्भ तपासणी आणि गर्भपात करण्याचा अवैधरित्या उद्योग सुरू असल्याचे समोर आले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. त्या घटनेप्रकरणी संबंधित डॉक्टरांच्या रॅकेटला गजाआड व्हावे लागले होते. याघटनेच्या एक वर्षानंतर सांगली शहरातील एका हॉस्पिटलमध्ये अशाच पद्धतीने बेकायदेशीरीत्या गर्भ तपासणी आणि गर्भपात करण्याचा उद्योग समोर आला होता. मागे घडलेल्या घटना आणि पुन्हा अवैध गर्भपात केंद्र समोर आल्याने प्रशासनाने विशेषतः महापालिका क्षेत्रातील आरोग्य विभागाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात गर्भ तपासणी आणि गर्भपात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कडक पावले उचलण्यात आली आहेत.
133 सोनोग्राफी सेंटर कार्यरत -
सांगली महापालिका क्षेत्रात पालिकेने या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर एक सर्व्हे करून पालिका क्षेत्रातील सोनोग्राफी सेंटरची यादी तयार केली. आज महापालिका क्षेत्रामध्ये जवळपास 133 सोनोग्राफी सेंटर्स आहेत. यात 6 शासकीय आणि 127 खासगी सोनोग्राफी सेंटर्स आहेत. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर रित्या गर्भलिंग चाचणी होत नाही. तशी उपाययोजना याठिकाणी आरोग्य विभागाकडून राबवण्यात आली आहे.
हेही वाचा - मेहनतीचं चीज! शेतकरी कुटुंबातील पोरगा झाला 'डॉक्टर'
कारवाईसाठी वेगवेगळ्या उपयोजना -
गर्भलिंग तपासणी आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी राबवण्यात आलेल्या योजनेबाबत सांगली महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्याशी 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीने संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये ज्या घटना घडल्या त्यानंतर पालिका प्रशासनाकडून वेगवेगळे उपाय योजना राबवण्यात आलेले आहेत. यात सर्वात महत्त्वाचे या सर्व महापालिका क्षेत्रातील सोनोग्राफी सेंटरची यादी तयार करण्यात आली. त्यांचा सर्व्हे करण्यात आला. ज्यात 133 सोनोग्राफी सेंटर समोर आले आहेत. याठिकाणी पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात.
दर 3 महिन्याला तपासणी -
सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यात येते. यासाठी एक पथकसुद्धा अस्तित्वात आहे. या पथकाकडून दर तीन महिन्याला महापालिका क्षेत्रातील सोनोग्राफी सेंटर्स त्याठिकाणी भेट देऊन त्यांची तपासणी करण्यात येते. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीररित्या गर्भ तपासणी किंवा गर्भपात होत नाही, याची कसून तपासणी केली जाते. यामध्ये केंद्रीय पथकाचा समावेश असून जर कोणत्या नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाली. तर त्याप्रमाणेही कारवाई केली जाते. दर तीन महिन्याच्या तपासणीचा अहवाल हा आयुक्तांकडे सादर केला जातो, तो अहवाल हा शासनाकडे सादर केला जातो. गेल्या 2 वर्षात करण्यात आलेल्या कडक अंमलबजावणीमुळे कोणतेही प्रकार समोर आले नाहीत, असे डॉ. ताटे यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - विशेष : ऑनलाइन कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईससमोर अनेक अडचणी.. अमेझॉनच्या डिलिव्हरी बॉईसचे पुण्यात आंदोलन
गभलिंग तपासणी मध्ये सकारात्मक परिणाम -
प्राची सोनोग्राफी सेंटर चालक डॉ. प्रसाद चिटणीस यांच्याशीदेखील 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीने संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यामध्ये काही दुर्दैवी घटना घडल्या. त्यानंतर प्रशासनाकडून कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्व सोनोग्राफी सेंटर चालकांकडून या नियमांचे पालन करण्यात येत आहे. शासनाकडून त्याचबरोबर सोनोग्राफी सेंटर चालकांच्याकडून संबंधित चाचण्यांसाठी येणाऱ्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गर्भपात आणि स्त्री भ्रूणहत्येच्या बाबतीत जागृती करण्यात आली आहे. त्यामुळे गर्भलिंग चाचणी करण्यासाठी विचारणा होत नाही. थोड्या फार वेळा विचारणा करण्यात येते. मात्र, त्यांना आम्ही शासनाचे आदेश आणि इतर गोष्टी समजून सांगतो. त्यामुळे जिल्ह्यात आज सकारात्मक परिणाम पाहायला मिळत असल्याचे सोनोग्राफी डॉ. प्रसाद चिटणीस यांनी सांगितले.