सांगली - कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी काळात हनुमान जयंती निमित्त गावातून पालखी काढल्याबद्दल १७ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिरज तालुक्यातील शिपूर गावात ही घटना घडली. संपूर्ण देशभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. सर्वत्र संचारबंदी पाळण्यात येत आहे. सर्वच धार्मिक सण उत्सव रद्द करण्याच्या सूचनाही राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. असे असतानाही अनेक ठिकाणी संचारबंदीचे नियम तोडण्याच्या घटना घडत आहेत.
आज हनुमान जयंती आहे. मात्र, ही जयंती एकत्रित साजरी न करण्याचे आवाहन असताना, मिरज तालुक्यातील शिपुरमध्ये हनुमान जयंती एकत्रित साजरी करण्यात आली. यानिमित्ताने पालखी सोहळा पार पडला. गावातील अनेक लोकांनी एकत्र येत गावातून पालखी मिरवणूक काढली. याची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी २० जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले, असून १६ जणांना अटकही केली आहे.