सांगली - मागील महिन्यापासून इस्लामपूरच्या एका व्यक्तीने कापूसखेड रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमीतच मुक्काम ठोकला आहे. घरी पत्नी आणि मुलीला त्रास नको म्हणून तो दिवसरात्र स्मशानभूमीत आलेले कोरोना पॉझिटिव्ह मृतदेह दहन करण्याचे काम करत आहे. दिलीप मनोहर सावंत असे या व्यक्तीचे नाव आहे.
कामाची गरज असल्याने एक महिन्यांपासून स्मशानभूमीतच राहून 'तो' लावतोय मृतदेहांची विल्हेवाट! मागील महिन्यात एक धक्कादायक बातमी सर्वत्र व्हायरल झाली की, अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके कुत्र्यांनी तोडले. ही घटना अनावधानाने घडली असली तरी ती समर्थनीय नक्कीच नव्हती. त्यामुळे सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी कंत्राट देण्याचा निर्णय घेतला. परंतु कोरोना पॉझिटिव्ह मृतदेह जाळण्यासाठी कोण पुढे येणार? मात्र अशा परिस्थितीत बेरोजगार असलेला दिलीप सावंत पुढे आला. त्याने ही जबाबदारी घेतली. नगरसेवक सदानंद पाटील यांनीही त्याला मदत पोहोचवलीखासगी वाहनचालक म्हणून कसेबसे पोट भरणारा दिलीप कोरोनाच्या काळात पूर्णतः बेरोजगार झाला. परंतू या ठेक्याने त्याच्या जगण्याला दिलासा मिळाला. ठेक्याचे फॉर्म भरण्यासाठी त्याच्या खिशात चारशे रुपयेही नव्हते. ती रक्कम डॉ. शेंडे यांनी स्वतः भरली. दिलीपचे मूळ गाव पलूस तालुक्यातील सावंतपूर आहे. पोटापाण्याच्या धडपडीत गेली वीस वर्षे इस्लामपूरात राहतो. कोरोना संसर्गाचा कहर वाढलेला आणि स्वतःचे नातेवाईकही ज्या मृतदेहाजवळ जायला घाबरत होते, त्या काळात दिलीपने दिवस-रात्र जागून अंत्यविधी केले. एकदा तर सलग 19 मृतदेह त्याला दहन करावे लागले. त्याने सहकारी शनिदेव बिराजदार, समीर कांबळे आणि माणिक वाघमारे यांच्या सहकाऱ्यांच्यासमवेत न थकता ते दहन केले. सध्या संसर्गाची तीव्रता कमी झाली असली तरी दिवसाला सरासरी चार ते सहा मृतदेह दहन करावे लागतात. पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्याधिकारी प्रमिला माने, अधिकारी अनिकेत हेंद्रे, साहेबराव जाधव, दिलीप कुंभार यांचे चांगले सहकार्य मिळत असल्याचे त्याने सांगितले.
मालकावरच अंत्यसंस्काराची वेळदिलीपकडे ठेका आल्यापासून त्याने गेल्या महिन्यात 120 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. पूर्वी ज्या मालकाकडे चालक म्हणून काम केले, त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावे लागले, हे सांगताना सावंत यांचे डोळे पाणावले. कोरोनामुळे जगणे नको झाल्याच्या काळात ही संधी चालून आली. नशिबाची साथ म्हणायची. खिशात चारशे रुपयेही नसताना मला हे काम त्या डॉक्टर आणि अधिकाऱ्यांमुळे मिळाले, त्यांचे उपकार मी आयुष्यभर फेडू शकणार नाही, अशा शाब्दांत दिलीपने स्वत:च्या भावना व्यक्त केल्या.