सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील दारूची परमीट रुम, बियर बार बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 31 मार्चपर्यंत सर्व परमीट रूम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर फक्त वाईन शॉप सुरू राहणार असून केवळ सीलबंद दारू विक्रीला परवानगी असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोना या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्ह्यातील दारूची परमिट रूम, बियर बार, हॉटेल्स बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दारू पिण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. यामुळे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला जिल्ह्यातील परमीट रूम, बियर बार आणि हॉटेल्स बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील सर्व परमीट रूम, बियर बार, हॉटेल चालकांना 31 मार्चपर्यंत हॉटेलमध्ये बसून दारु पिण्यास बंदी घातली आहे. तर केवळ सीलबंद दारू विक्रीला परवानगी असणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता हॉटेलमध्ये बसून दारू पिण्यावर 31 मार्चपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.
हेही वाचा - #COVID19 : मिरज जंक्शनमधून धावणाऱ्या 'या' रेल्वेगाड्या रद्द