सांगली - दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या रागातून मित्राचा खून केल्या प्रकरणी एका तरुणास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली. जितेंद्र उर्फ प्रदीप तायडे (रा.मिरज) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
मिरजेतील संजयनगर झोपडपट्टी येथील परशुराम कट्टीमनी या तरुणाचा १४ ऑक्टोबर २०१३ रोजी निर्घृण खून झाला होता. परशुराम याचा मित्र जितेंद्र उर्फ प्रदीप तायडे याने हा खून केला होता. दुर्गामाता उत्सवावेळी ही घटना घडली होती. आरोपी जितेंद्रचे १३ ऑक्टोबरला काही मुलांबरोबर भांडण झाले होते. त्यानंतर त्याने या घटनेची सर्व माहिती परशुरामला सांगत त्याच्याकडे दारू पिण्यास पैसे मागितले. मात्र, परशुरामने पैसे देण्यास नकार दिला. यातून दोघात वादावादी झाली आणि त्यामुळे जितेंद्रने परशुरामवर कुऱ्हाडीने हल्ला करत त्याचा खून केला.
घटनेनंतर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आज या खटल्याची सांगली जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडल्यानंतर सरकारी पक्षाकडून साक्षीदार तपासण्यात आले. यात मृत परशुराम याचा भाऊ आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. या आधारे न्यायालयाने जितेंद्रला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.