सांगली - सांगलीच्या कोरोना नियंत्रण कक्ष आणि पोलीस दलात कोरोनाने शिरकाव केला आहे. जिल्हा परिषदे कार्यालयात असणाऱ्या कोरोना नियंत्रण कक्षातील एका अधिकाऱ्याला तसेच सांगली पोलीस दलातील एक अधिकारी व सहा कर्मचारी, अशा सात पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे पोलीस दलासह जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नियंत्रणासाठी झटणारे सांगली जिल्ह्यतील कोरोना योद्धेच आता कोरोनच्या विळख्यात सापडत आहेत. विशेष म्हणजे सांगली जिल्ह्याचे कोरोना रुग्ण आणि स्थिती नियंत्रण करण्यासाठी कार्यरत असलेल्या जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षातच थेट कोरोनाचा शिरकाव झाला आहे. याठिकाणी सेवा बजावणाऱ्या एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्या अधिकाऱ्यास ताप येऊन कोरोना लक्षण आढळून आल्याने स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रण कक्षासह जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनानात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे रस्त्यावर राहून कोरोना विरोधात लढणाऱ्या सांगली पोलीस दलातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मिरजेतील एक महिला पोलीस अधिकारी पॉझिटिव्ह आल्याची घटना ताजी असताना सांगली पोलीस दलातील आणखी सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
आज (दि. 23 जुलै) सांगली महापालिकेकडून सांगली शहर पोलीस ठाण्यात आरोग्य तपासणी करत रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि 2 वाहतूक शाखेत कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच पोलीस मुख्यालयात कंट्रोल शाखेत कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्यालाही कोरोना लागण झाली आहे. खासगी लॅबमध्ये करण्यात आलेल्या चाचणीत या कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आटपाडी पोलीस दलातील तिघांना कोरोना लागण झाली आहे. यासर्वांना उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर कोरोना नियंत्रण कक्ष आणि सांगली पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे.