सांगली - शहरात एका बँकेचा कर्मचारी पॉझिटिव्ह सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिक अलर्ट झाले आहे. बाधित व्यक्ती वास्तव्यास असलेला विजयनगर परिसर तसेच बँकेची शाखा सील करण्यात आली आहे. याचसोबत बँकेतील ११ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची तपासणी सुरू आहे. तसेच कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
संबंधित व्यक्ती वावरत असणारा परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. या या रुग्णाला कोणतीही फॉरेन हिस्ट्री नाही. तसेच तो कोणत्याही कोरोनाबाधितांच्या संपर्कात आला नसल्याचे समोर येत आहे. सध्या वैद्यकीय अधिकारी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्याच्यावर मिरजेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णाच्या संपर्कात असणारे तसेच बँकेचे ११ कर्मचारी व पाच कुटुंबीयांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची स्वॅब टेस्ट घेण्यात आली असून संबंधितावर उपचार सुरू आहेत. तसेच खबरदारीसाठी या व्यक्तीची इन्स्टिट्यूट क्वारंटाईनमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
बँकेत काम करत असल्याने या व्यक्तीच्या संपर्कात अनेक नागरिक आले होते. या सर्वांची लिंक ट्रेस करण्यासाठी प्रशासनाने 60 पथके तयार केली आहेत. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार सर्व भागात औषध फवारणी सुरू केली असून आशा वर्कर यांच्याकडून घरोघरी जाऊन माहिती घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.