सांगली - कोरोनाच्या भीतीने एका वृद्धाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आटपाडीच्या शेटफळे येथे घडली. शेजारच्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्याच्या धसक्याने दिगंबर खांडेकर (वय ६८) यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
जिल्ह्यातील आटपाडी येथील शेटफळे येथील एका एसटी चालकाला दोन दिवसांपूर्वी कोरोना लागण झाली होती, तर त्या चालकाच्या घरातील दोन मुलांनासुद्धा कोरोना लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर प्रशासनाने त्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या संपर्कातील २२ जणांना क्वारंटाईन केले होते. त्यामधील एका मुलाच्या चुलत्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
खांडेकर यांच्या भावाच्या मुलाला क्वारंटाईन करण्यात आले होते. तर कोरोनाबाधित कुटुंबाचे घर खांडेकर यांच्या घरापासून अवघ्या दहा फुटाच्या अंतरावर आहे. त्यामुळे कोरोनाची धास्ती खांडेकर आणि त्यांच्या कुटुंबामध्ये पसरली होती.
शुक्रवारी गावातील पोलीस पाटील, आरोग्य विभागाकडून त्या कुटुंबाला धीर देण्यात आला होता, त्याची तपासणी करण्यात आली होती. त्यांना कोरोनाची लक्षणे नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, तरीही दिगंबर खांडेकर हे अस्वस्थ होते. त्यांच्या मनात आपणालाही कोरोना लागण झाली आहे, अशी धास्ती निर्माण झाली होती. याच भीतीपोटी दिगंबर खांडेकर यांनी मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या घराच्या समोर असणाऱ्या एका बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी खांडेकर कुटुंब उठले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील एका वयोवृद्ध व्यक्तीने कोरोनाच्या भीतीमुळे आत्महत्या केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले होते.