सांगली - जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता वाढू लागली आहे. एप्रिल महिन्यापासून या संख्येत झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. सोमवारी एका दिवसात या संख्येत तब्बल 360 नव्या रुग्णांची भर पडली आहे, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नियोजन आणि कोरोना नियमांच्या अंमलबजावणीसाठी कडक पाऊले उचलण्यात येत आहेत.
कोरोना रुग्ण संख्येत वाढ
जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण संख्येमध्ये पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे. एप्रिल मार्चनंतर या रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोमवारी एकाच दिवसात 360 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर आता पर्यंत जिल्ह्यातील 53 हजार 140 जण कोरोना बाधित झाले आहेत. यापैकी 48 हजार 626 जण हे कोरोना मुक्त झाले आहेत. 1 हजार 817 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याबरोबर जिल्ह्यामध्ये ही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कडक पावले उचलत राज्यात मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
प्रशासन अॅक्टिव्ह मोडवर
जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून कोरोना नियमांच्या अंमलबजावणीसाठी कडक धोरणे राबवण्यात येत आहेत. मिरजेच्या कोरोना रुग्णालय, जिल्ह्यातील आरोग्य केंद्र त्याचबरोबर शासकीय रुग्णालयात अतिरिक्त बेडच्या व्यवस्थांबरोबर खासगी रुग्णालयातही कोरोना उपचार सुरू करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्याच्या अखेरीस कोरोना रुग्ण संख्या अधिक वाढण्याचे संकेत असल्याने त्यादृष्टीनेही प्रशासनाकडून सर्व पातळ्यांवर नियोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अडीच लाख जणांचे लसीकरण
लसीकरण मोहीम सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून गतीने राबवण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास अडीच लाख जणांना कोरोना लसीकरण करण्यात आलेली आहे. 227 केंद्रावरून ही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे, त्याचा लाभ अधिकाधिक व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.