सांगली - केद्राने राज्यातील पूर आपत्ती परिस्थितीत मदतीची आपली जबाबदारी पार पाडावी, राज्य सरकारही तसूभर कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पश्चिम महाराष्ट्रात वारंवार येणाऱ्या महापुराच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी कराड या ठिकाणी राज्य आपत्ती निवारण पथकाचे केंद्र कायमस्वरुपी निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात येईल,असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले, ते सांगलीमध्ये बोलत होते.
हेही वाचा - सांगलितील पूर परिस्थितीची अजित पवारांनी केली पाहणी, राज्य सरकार पुरग्रस्तांच्या पाठीशी असल्याची दिली ग्वाही
जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा घेतला आढावा..
सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पाहणी केली. भिलवडी यासह सांगली शहरातल्या पूरस्थितीची पाहणी करत पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. यानंतर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अजित पवार यांनी जिल्ह्यातील पूरपरिस्थिती व मदतकार्याचा आढावा घेतला. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह जिल्ह्यातील आमदार व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
एकही जीवितहानी नाही...
त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात यंदा प्रचंड प्रमाणात पाऊस झाला आहे. गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासात नवजा आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जेवढा पाऊस झाला नाही, तेवढा पाऊस यंदा झाला आहे. नवजा या ठिकाणी 31 इंच इतक्या पावसाची नोंद झाली आहे, तर कोयना धरणात एकाच दिवसात साडेसोळा टीएमसी इतक्या पाण्याची आवक झाली आहे. या व्यतिरिक्त कृष्णा, वारणा आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या पंचगंगा नदी पाणलोट मुक्त क्षेत्रातही प्रचंड पाऊस झाला आहे. त्यामुळे, महापुराची परिस्थिती निर्माण झाली आणि ही एक नैसर्गिक आपत्ती आहे, पण राज्यात दरड असेल किंवा महापूर असेल या घटनेमध्ये शेकडो लोकांचे मृत्यू झाले, काही लोक बेपत्ता झाले, पण सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी अद्यापही झाली नाही, ही एक चांगली बाब असल्याचे मत उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केले आहे.
केंद्राने ही जबाबदारी पार पाडावी..
राज्यातील महापूर असेल किंवा दरड कोसळून झालेल्या घटना असतील, यामध्ये राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. युद्धपातळीवर सर्व ठिकाणी मदत कार्य सुरू आहे. याबाबत केंद्रालाही सर्व घटनांची माहिती दिली जात आहे. आणि केंद्राकडूनही राज्याला सहकार्याची भूमिका घेण्यात आली आहे. मात्र, आता केंद्राने राज्यातल्या पूरग्रस्त आणि दुर्घटनाग्रस्त नागरिकांना मदतीची आपली जबाबदारी पार पाडावी, आणि राज्य सरकारही पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीमध्ये तसूभरही कमी पडणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
दरड दुर्घटना प्रकरणी तज्ञ समिती गठीत...
महाड तालुक्यातली तळई दरड दुर्घटना त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील आंबेघर येथील दरड दुर्घटना याठिकाणी वेळेवर मदत पोहचवण्याचा प्रयत्न आघाडी सरकारकडून करण्यात आला आहे. मात्र, यामध्ये पावसाचे मोठे व्यत्यय आले होते, पण तरीही युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य करण्यात आले. आता या दरड कोसळण्यामध्ये वृक्ष तोड, असे काही कारण असल्याचे बोलले जात आहे, मात्र नेमके कारण काय यासाठी राज्य सरकारकडून एक तज्ञ समिती गठीत करण्यात येईल आणि या समितीच्या माध्यमातून जो आहवाल येईल, त्यावर पुढील गोष्टींच्या बाबतीत निर्णय घेण्यात येईल असे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
कराडमध्ये कायमस्वरुपी एसडीआरएफ केंद्र...
सांगली-कोल्हापूर-सातारा त्याचबरोबर कोकणात वारंवार महापूर येण्याच्या घटना घडत आहेत आणि यावेळी आपत्तीच्या प्रसंगी तातडीने बचावकार्यासाठी एनडीआरएफसारख्या पथकांची गरज भासते. त्यामुळे, राज्य सरकारकडून आता एनडीआरएफच्या धर्तीवर राज्य आपत्ती निवारण पथक निर्माण करून त्याचे केंद्र कराड व त्याचबरोबर कोकणात कायमस्वरुपी करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात येईल, त्यामुळे तातडीची मदत आपत्ती प्रसंगात मिळेल, असे पवार यांनी स्पष्ट केले.
मंत्री पूरग्रस्त दौऱ्यात सर्व अधिकारी जाणार नाहीत..
सध्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यातील मंत्री असतील किंवा व्हीआयपी व्यक्ती असतील त्यांचे दौरे सुरू झाले आहेत. पण, अशा या प्रसंगात प्रशासनाला पंचनामे असतील किंवा इतर मदत कार्यात अडथळे टाळण्यासाठी जिल्हाधिकारी,आयुक्त, पोलीस प्रमुख किंवा इतर मुख्य अधिकारी यांची उपस्थिती गरजेची नसणार आहे, आणि अशा या दौऱ्यांसाठी जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी नेमण्याची सूचना देण्यात आली असून या नोडल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंत्री आणि व्हीआयपी व्यक्तींना नोडल अधिकारी यांच्याकडून सर्व ती माहिती मिळेल असे, अजित पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी आमदारांचे वेतन पूरग्रस्तांसाठी..
तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी पूरग्रस्तांना मदतीसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी, सामाजिक संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन करत पूरग्रस्तांना मदत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे एक महिन्याचे वेतन देण्यात येणार असल्याची घोषणाही अजित पवार यांनी यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत केली.
हेही वाचा - पूरग्रस्तांच्या मदतीचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीत - उपमुख्यमंत्री