सांगली- कृष्णाकाठच्या पूर पट्ट्यातील बफरझोनमध्ये ३०० अतिक्रमणधारी आहेत. या अतिक्रमणधारकांना शहर महापालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि पुराचा संभाव्य धोका लक्षात घेता नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे अधीच परिसरातील नागरिक धस्तावले आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. या नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या नोटिसांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्थगिती दिली आहे.
लॉकडाऊन असल्याने अशा पद्धतीची कारवाई करू नये अशा सूचनाही पाटील यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांना दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्याकडून समजले आहे. लॉकडाऊनमुळे पूर पट्ट्यातील लोकांच्या हाताला काम नव्हते. अशातच महापालिकेने ३०० अतिक्रमनधारकांना नोटीस पाठविली होती. ३० दिवसांमध्ये आपली घरे खाली करून बांधकाम पाडून घ्यावेत, अन्यथा पालिकेकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे, नागरिक चिंतेत होते. याबाबत सांगली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महापालिकेकडे नोटीस मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जलसंपदामंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती.
या पार्श्वभूमीवर काल शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची भेट घेण्यात आली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी दुरध्वनीवरून आयुक्त कापडणीस यांची चर्चा झाली आणि संचारबंदीचा काळ असल्याने तूर्त या नोटिसांना स्थगिती देण्याचे आदेश मंत्री पाटील यांनी दिल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी दिली. त्यामुळे, भयभीत झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.