सांगली - महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे, तशी पालिकेची यंत्रणा तोकडी पडत आहे का? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. कारण एका कोरोना संशयित निराधार महिलेचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यूनंतर तिची खरी फरफट सुरू झाली. कोरोना संशयित असल्याने तिचा मृतदेह टेस्टसाठी रुग्णालयात घेऊन जायचा होता. मात्र त्यासाठी रुग्णवाहिका उपल्बध करून देण्यास प्रशासनाला तब्बल ६ तासांचा अवधी लागला. तोपर्यंत निराधार महिलेचा मृतदेह तसाच पडून होता. या प्रकारमुळे पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबरोबर असंवेदनशीलता समोर आल्याने नगरसेवक आणि नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सांगली महानगर पालिकेचा भोंगळ कारभार सध्या कोरोनाचा सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, तो रोखण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे. मात्र, या महामारीच्या बाक्या प्रसंगात सांगली महापालिकेच्या असंवेदनशीलतेचा कळस सांगली शहरामध्ये पाहायला मिळाला. शहरातील फौजदार गल्ली येथे होम क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या एका निराधार महिलेला गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास त्रास होऊ लागला. याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते युनूस महात, नगरसेवक करीम मेस्त्री आणि अभिजित भोसले यांनी धाव घेतली. मात्र सदर महिला होम क्वारंटाईनमध्ये व कोरोनाचे लक्षण दिसून आल्याने सगळ्यांनी चार पाऊल लांब राहणे पसंत करत तातडीने पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला याची कल्पना दिली. तसे पालिकेची एक महिला अधिकारी व पथक त्याठिकाणी पोहोचले सुद्धा. मात्र तोपर्यंत त्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. मात्र, तिच्या मृत्यूनंतरचा प्रकार हा महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा दर्शवणारा ठरला. क्वारटाईन असलेल्या महिलेच्या मृत्यूनंतर त्या महिलेची कोरोना टेस्ट करणे गरजेचे होते आणि त्यासाठी मृतदेह मिरजेच्या कोरोना रुग्णालयात घेऊन जाणे आवश्यक होते. तो मृतदेह नेण्यापूर्वी पालिकेसह नागरिकांमधील असंवेदनशिलता पाहायला मिळाली.. आणि सुरू झाला असंवेदनशीलतेचा कळस... 'त्या' वृद्ध निराधार महिलेच्या मृत्यू नंतर आता कोरोना रुग्णालयात मृतदेह घेऊन जाण्यासाठी पालिकेच्या शव वाहिकांना पाचारण करण्यासाठी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरु केला. मात्र शववाहिका विभागाकडून पहिल्यांदा शववाहिका उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले,काही वेळाने पुन्हा संपर्क साधला असता,चालक उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले,तर कधी पीपीई किट नसल्याचे कारण देण्यात आले.आणि या उडवा उडवीच्या उत्तरात २ तासांचा वेळ गेला. पण पालिकेची यंत्रणा काही केल्या हलत नव्हती. मग सामाजिक कार्यकर्ते युनूस महात व नगरसेवक करीम मेस्त्री यांनी १०८ या रुग्णवाहिका विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर २ रुग्णवाहिका हजर सुद्धा झाल्या. मात्र या दोन्ही रुग्णवाहिककेच्या चालकांनी नियमानुसार मृतदेह घेऊन जाण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे संगळ्यांच्यासमोर आता मृतदेह कसा घेऊन जायचा? या घोळात रात्रीचे १२ वाजले, वेळ वाढत होता. नगरसेवकांपासून सामाजिक कार्यकर्ते सर्वजण आप-आपल्या पातळीवर पालिकेच्या यंत्रणेला माणुसकीसाठी जागे होण्याची विनंती करत होते. मात्र काही केल्या पालिकेच्या यंत्रणेची माणुसकी जागी होत नव्हती. त्यानंतर नगरसेवक अभिजित भोसले यांनी थेटे शववाहिकेचे कार्यालय गाठले आणि अखेर पहाटे ३ वाजता आरोग्या विभागाच्या यंत्रणेला जाग आली आणि शववाहिका अखेर फौजदार गल्लीत पोहोचली.कोरोना संशयित मृतदेह उचलणार कोण ?शववाहिका बरोबर आणखी एक प्रश्न सर्वा समोर होता. तो म्हणजे कोरोन संशियत असणाऱ्या महिलेच्या मृतदेहाला हात कोणी लावायचा? कारण सगळ्यांना जीवाची भीती होती. आपल्यालाही कोरोनाची लागण झाली तर? या भीतीने त्या कोरोना संशयित महिलेचा मृतदेह उचलण्यासाठी कोणीही धजावत नव्हते. सध्याच्या स्थितीत हे होणे साहजिक होते. पालिका कर्मचाऱ्यांनीही आपली ड्यूटी नसल्याचे कारण देत हात वर केले होते.आणि "तो" तरुण पुढे आला .. अशा सर्व घोळात सलमान मेस्त्री हा युवक आणि त्याचे सहकारी पुढे आले. त्याने आपण मृतदेह उचलून ठेवायला तयार असल्याचे सांगितले. तसे अनेकांनी सलमान व त्याच्या तिघा मित्रांना कशाला रिस्क घेतोस, ते आपले काम नाही. मृतदेह उचलू नकोस असे काळजी पोटी सल्ला दिला. मात्र 'त्या' तिघांनी मनाशी निश्चय पक्का केला होता आणि मग सर्वांची पीपीई किट घालण्याची तयारी सुरू झाली. यावेळीही अनेकांनी सलमान व त्याच्या सहकाऱ्यांना विचार करण्याचा सल्ला दिला. मात्र, सर्वानी स्वतःला तो पर्यंत सर्व दृष्ट्या तयार करून घेतले आणि त्या महिलेचा मृतदेह शवाहिकेत ठेवत रुग्णालयालात पाठवण्यता आला. यासर्व गोष्टीला तब्ब्ल ६ तासांचा विलंब झाला. त्यामुळे याबाबत नगरसेवक असणारे करीम मेस्त्री आणि अभिजित भोसले यांनी पालिकेच्या ढिसाळ कारभारावर जोरदार शब्दात आक्षेप नोंदवला आहे. या सर्व प्रकारातून कोरोना युद्धात महापालिका प्रशासनाची यंत्रणा तोकडी पडण्या बरोबर पालिकेची असंवेदनशीलत पाहायला मिळाली. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.