सांगली - वाळवा तालुक्यातील देवर्डे गावच्या लोकनियुक्त सरपंच रेखा दीपक पाटील यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. 7 विरुद्ध 1 अशा मतांनी हा ठराव मंजूर झाला. याबाबत तहसीलदार रवींद्र सबनीस हे जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचा आदेश पाठवणार आहेत. मात्र, सरपंच रेखा पाटील यांनी त्यांच्यावर ठेवलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे.
सरपंच रेखा पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी सदस्यांनी वाळवा तहसीलदारांकडे बैठकीची मागणी केली होती. या मागणीनुसार बुधवारी ग्रामपंचायत सदस्यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये गुप्त मतदान घेण्यात आले. यामध्ये 7 विरुद्ध 1, असा अविश्वास ठराव सरपंच रेखा पाटील यांच्या विरोधात मंजूर झाला. यामुळे पुढील कारवाईसाठी हे प्रकरण सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार आहे. सात दिवसात जिल्हाधिकारी याबाबत निर्णय घेतील. पाटील या लोकनियुक्त सरपंच असल्याने पुन्हा लोकांकडूनच मतदान घेतले जाईल, असे वाळवाचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सांगितले.
हेही वाचा - 'तिने' कॅन्सरग्रस्तासाठी केले केस दान; म्हणते सर्व मुली करू शकतात कॅन्सरग्रस्तांसाठी केस दान
महिला सरपंच रेखा पाटील या ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कामकाजात मनमानी कारभार करत आहेत. कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता त्या काम करतात. सरपंचांच्या कर्तव्यात अनेक ठिकाणी त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यांचे पती अनधिकृतपणे ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करतात. त्यामुळे गावाच्या विकासाला खीळ बसली असून विकासात्मक कामे रखडली आहेत, असे आरोप सरपंच रेखा पाटील यांच्यावर ठेवले आहेत.
रेखा पाटील यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. गावाचा विकास योग्य पद्धतीने सुरू असून गावात आत्तापर्यंत 25 लाखांची कामे केली आहेत. बनावट नोंदी घालण्यासाठी माझ्यावर काही सदस्य दबाव आणत आहेत. मी 2009 साली भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेमध्ये झालेला भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये काही सदस्य आणि राजकीय नेत्यांचाही समावेश असल्याने भीती पोटी माझ्यावर अविश्वास ठराव मंजूर केला आहे, असे सरपंच रेखा पाटील यांनी सांगितले.
अशी आहे ग्रामपंचायत कार्यकारीणी -
सध्या देवर्डे ग्रामपंचायतीमध्ये सात सदस्य कार्यरत असून लोकनियुक्त सरपंच हे आठवे पद आहे. ग्रामपंचायतीमध्ये वारणा दूध संघाचे माजी संचालक केरू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता स्थापन करण्यात आलेली आहे. यामध्ये संचालक केरू पाटील यांचे ४ सदस्य आहेत, तर राष्ट्रवादीचे ३ सदस्य आहेत. देवर्डेच्या सरपंच रेखा पाटील या केरू पाटील यांच्या बाजूने सत्ताधारी गटाकडून निवडून आलेल्या अधिकृत लोकनियुक्त सरपंच आहेत. सत्ताधारी गटातील चार आणि विरोधी गटातील तीन सदस्यांच्याकडून ६ फेब्रुवारीला महिला सरपंच रेखा पाटील यांच्याविरुद्ध हा अविश्वास ठराव दाखल करण्यात आलेला होता.