सांगली : इस्लामपूर येथील निमिष दशरथ पाटील याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा 2019 परीक्षेत देशात 389 वा क्रमांक पटकावला. निमिषच्या या यशाने आई शारदा व बहीण निकिता यांनी त्याला पेढे भरवले तसेच मित्रांनी जल्लोष केला. निमिष याने तिसऱ्या प्रयत्नात हे यश संपादन केले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल आज (मंगळवार) जाहीर झाला. युपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेत इस्लामपूरच्या निमिष दशरथ पाटील याने 389 वा क्रमांक पटकावत यश संपादन केले आहे. गुणवत्ता यादीनुसार निवड झालेल्या उमेदवारांतून तो आयएएस होणार आहे. त्याच्या यशाने कुटूंबाने व मित्र परिवाराने गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला. शालेय जीवनाच स्पर्धा परीक्षेचे स्वप्न बाळगले होते. जिद्द, चिकाटी,अभ्यासात सातत्य ठेवल्याने यश मिळाल्याचे त्याने सांगितले.
मुंबईच्या सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये त्याने पदवी घेतली होती. त्यांनतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी थेट दिल्ली गाठली होती. यशाबद्दल बोलताना निमिष म्हणाला,” यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा निश्चय केला होता. पहिल्या दोन मुख्य परीक्षेत मुलाखती प्रयत्न केले होते, पण यश मिळाले नाही. पण आई वडीलांच्या पाठींब्याने अपेक्षित यश मिळवलेचं, आजचा निकाल अपेक्षित होता. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाल्याने सांगताना तो आनंदात होता. निमिषचे प्राथमिक शिक्षण डॉ. व्हीएस नेर्लेकर विद्यालयात, माध्यमिक शिक्षण आदर्श बालक मंदिर येथे झाले आहे. इयत्ता चौथी व सातवी स्कॉलरशिप परीक्षेतही निमिषने गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते.
आज मंगळवारी अंतिम निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियुक्ती यादी जाहीर करण्यात आली आहे. सप्टेंबर 2019 घेण्यात आलेली लेखी परीक्षा आणि फेब्रुवारी-ऑगस्ट, 2020 मध्ये घेण्यात आलेल्या मुलाखतींच्या आधारावर आयोगाने गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. देशातून यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत एकूण 2,304 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.