सांगली - जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गुरुवारी दिवसभरात तब्बल 70 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण संख्या 560 झाली आहे. तर एकूण आकडा 1 हजार 284 झाला आहे. 682 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 42 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी याबाबतची माहिती दिली.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. गुरुवारी कोरोनाचा कहर कायम आहे. एकाच दिवसात तब्बल 70 रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामध्ये ग्रामीण भागापेक्षा सांगली महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या अधिक आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील तब्बल 57 जणांचा समावेश आहे.
ज्यात सांगली शहरातील 40 आणि मिरज शहरातील 17 जणांचा समावेश आहे. सांगली शहरातील विश्रामबाग क्रांती भेळ सेंटर, खणभाग नळभाग, वारणाली विद्यानगर, संजयनगर, जगदाळे प्लॉट , चांदणी चौक , रमामातानगर , फौजदार गल्ली , भोई गल्ली, गावभाग , गवळी गल्ली , जामवाडी, रामराहिम हडको कॉलनी , सांगली शहर पोलीस स्टेशन , समृद्धीनगर , विश्रामबाग या भागांचा समावेश आहे. तर मिरज शहरातील आदित्य डायग्नोस्टिक, मेघजीबाई वाडी , देवल कॉम्प्लेक्स , बबलीबाई चाळ , जवाहर चौक , विजय कॉलनी, बेथलेमनगर , कुपवाड, हनुमान नगर , मुजावर गल्ली येथे कोरोना रुग्ण आढळले आहेत.
नव्या रुग्णांमध्ये ग्रामीण सांगलीतील आटपाडी शहर (5) , लेंगरेवाडी (2), कवठेमहांकाळ (1) , नागज (1) , भोसे (1), पलूस तालुका ब्रह्मनाळ (1) , बांबवडे (2), या भागातील रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोना उपचार घेणारे 40 जण हे अतिदक्षता विभागात असून यामधील 27 जण हे ऑक्सिजनवर तर 13 जण हे नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर आहेत.