सांगली - राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात आज सांगली राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारविरोधात घंटानाद आंदोलन करत नागपूर आणि गुहागर येथील अल्पवयीन मुलीच्या खुनाचा निषेध करण्यात आला.
राज्यात महिलांच्या अत्याचारात मागील काही वर्षांत वाढ झाली आहे. नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची तर गुहागर येथील एका मुलीवर बलात्कार करून खून केल्याची घटना घडली आहे. याच्या निषेधार्थ बुधवारी सांगली राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी घंटानाद व थाळीनाद करत सरकारचा निषेध नोंदवला.
यावेळी महिलांच्या अत्याचाराविरोधातील घटनांत पोलिसांकडून आरोपी सुटतील अशा पद्धतीने कमी दुवे ठेवण्यात येतात, असा आरोप करण्यात आला. तसेच महिलांवरील वाढलेले अत्याचार रोखण्यात राज्याचे गृहखाते अपयशी ठरलेला आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री व गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडून करण्यात आली.