सांगली - राज्यात महिलांवर वाढते अत्याचार, हे महाराष्ट्राला भूषणावह नाही. त्यामुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायदे अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी येत्या अधिवेशनात चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिन्ही नेत्यांच्या मनात आहे, तो पर्यंत हे सरकार चालणार असल्याचेही अजित पवारांनी म्हटले आहे. पवार सांगलीतील अंजनी येथे बोलत होते.
हेही वाचा... ..तरी आबांची पुण्याई आमच्यासोबत; मुनगंटीवारांच्या 'त्या' वक्तव्याला अजित पवारांचे उत्तर
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, दिवंगत आर.आर. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी अंजनी (सांगली) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले आणि त्यांना आदरांजली वाहिली. आर.आर. पाटील यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले होते. तासगावच्या अंजनी येथे आर.आर. पाटील यांना अभिवादन करण्यासाठी आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
कोरेगाव भीमा चौकशी प्रकरणी बोलताना ; या विषयावर शरद पवार बोलले असताना, आपण पुन्हा काही बोलायची गरज नाही. त्यांचे जे मत आहे ते संपूर्ण राष्ट्रवादीचे मत असल्याचे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले. तसेच राज्यातील महाविकास आघाडीच्या स्थिरतेबाबत बोलताना त्यांनी, जोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या मनात आहे. तोपर्यंत हे सरकार चालणार आहे. तो पर्यंत सरकारला काही होणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा... 'आज छत्रपतींची आठवण येते..! त्यांच्या काळातील कायदे आता लागू करण्याची गरज'
महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कायदे कडक करण्याची गरज...
राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत बोलताना अजित पवार यांनी कायदे अधिक कडक करण्याची गरज बोलुन दाखवली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, काही विकृत लोक असे कृत्य करतात. मात्र, महिलांवर होणारे अत्याचार हे महाराष्ट्राला भूषणावह नाही. त्यामुळे अत्याचार करणाऱ्यांच्या मनात वचक निर्माण करण्यासाठी कायदे अधिक कडक करणे गरजेचे आहे. येत्या अधिवेशनात याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच सर्व विरोधक आणि सामजिक संस्था यांच्याशी सुद्धा चर्चा केली जाणार नाही. यातून कायदा कडक कसा करता येईल, हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती यावेळी अजित पवारांनी दिली.
कायदा सर्वांना समान.. इ्ंदोरीकरांच्या वादावर दिली प्रतिक्रिया
सध्या राज्यात सुरु असलेल्या निवृत्ती महाराज इंदोरीक यांच्या वादाबाबत बोलताना अजित पवार यांनी, आपण त्यांचे वक्तव्य ऐकलेले नाही. टिव्ही व पेपरमध्ये फक्त ते पाहिलंय. पण कायदा हा सर्वांना समान आहे. सर्व व्यक्तींना कायदा आणि नियम सारखे आहेत. कायद्याचे उल्लंघन कोणी करू नये, असें मत अजित पवार यांनी व्यक्त केले.