सांगली - भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल विधान करून संपूर्ण देशाचा अपमान केला आहे. हा अपमान होताना भाजप आणि विशेष करून शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना लाज कशी वाटत नाही, असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील यांनी केला. ते विटा येथे बोलत होते.
शहीद करकरे आणि संपूर्ण देशाचा अपमान हा साध्वी प्रज्ञा सिंह आणि भाजपने केला आहे. एकीकडे शहिदांच्या नावावर मोदी मत मागत आहेत. त्यांच्या पक्षाच्या उमेदवार साध्वी या शहीद करकरे यांच्या मृत्यूवर आनंद व्यक्त करत आहेत. यावरून साध्वींच्या अंगात किती दहशतवादीपणा मुरला आहे, हे दिसत आहे.
शहीद हेमंत करकरे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आपण शहीद करकरे यांना चांगले ओळखत होतो. त्याचबरोबर साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याबद्दल आपणाला राज्याचा गृहमंत्री राहिल्याने सर्व गोष्टी माहिती आहेत. पण निवडणूक आचारसंहिता असल्याने काही गोष्टी बोलणे आपण टाळत आहोत, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाल्या होत्या साध्वी प्रज्ञासिंह -
दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारून माझे सुतक संपवले, असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह यांनी आज केले. यावरून देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.