सांगली - सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे, आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच झाडाचे पान का पडले, असे म्हणूनही भाजपा आंदोलन करू शकते, असा टोलाही पाटील यांनी धनंजय मुंडे प्रकरणावरून भाजपाला लगावला आहे. वाळवा तालुक्यातील कुरळप येथे ते बोलत होते.
मुंडें प्रकरणी भाजपावर निशाणा -
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राज्यभर भाजपाकडून आंदोलन करण्यात आले. आता मुंडे यांच्या विरोधातील तक्रार संबंधित महिलेने मागे घेतली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. महिलेने आता तक्रार मागे घेतली आहे. मुळात आम्ही अगोदरपासूनच सांगत होतो, थोडा वेळ जाऊन दिला पाहिजे. पोलिसांचा तपास पूर्ण व्हायला पाहिजे. पोलीस जो निष्कर्ष काढतील त्याप्रमाणे पुढील कारवाई होईल. मात्र, भाजपा ऐकण्याच्या मनस्थितीत नसते, असे पाटील म्हणाले.
झाडाचे पान का पडले..
भाजपाकडून मुंडे आंदोलन करण्यासाठी, सरकारला बदनाम करण्यासाठी आणि सरकार विरोधी वातावरणात निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा झाली. त्यांना आंदोलन करण्यासाठी कारण लागत नाही. अगदी झाडावरील पान का पडले, म्हणूनही भाजपा आंदोलन करू शकते. मात्र, आम्ही त्याकडे फारसे लक्ष देत नाही, असा टोलाही मंत्री पाटील यांनी यावेळी लगावला.