सांगली - चित्तथरारक आणि संगीतबद्ध मल्लखांबाच्या प्रात्यक्षिकांनी सांगलीच्या मिरजेत राष्ट्रीय शालेय मल्लखांब स्पर्धांना सुरुवात झाली. देशातील 11 राज्याच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. सांगली जिल्हा अम्यॅचुर असोसिएशन व क्रीडा विभागाच्या वतीने सांगलीच्या मिरजमध्ये 65 व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धा पार पडत आहेत.
माजी मंत्री आणि मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, सांगली जिल्हापरिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभागाचे उपसंचालक माणिकराव ठोसरे उपस्थित होते. हवेत फुगे सोडून या स्पर्धांना सुरुवात झाली.
या स्पर्धांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने यजमान महाराष्ट्र संघाने संगीतबद्ध व चित्तथरारक मल्लखांब आणि रोपखांब प्रात्यक्षिक सादर केली. यामध्ये मुलांच्या संघाने मशालखांब व संगीताच्या ठेक्यावर सांघिक मल्लखांब तर मुलींच्या संघाने तलवार रोपखांब आणि संगीताच्या तालावर सामूहिक रोपखांबाची प्रात्यक्षिके सादर केली. पुढील 3 दिवस या स्पर्धा पार पडणार आहेत.
राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ असणाऱ्या मल्लखांब खेळाला प्रोत्साहन मिळाले आहे. त्यामुळे आज मल्लखांब अनेक राज्यात पोहोचला आहे. मात्र, संपूर्ण देशात आणि देशाबाहेर मल्लखांब पोहोचवण्यासाठी राज्य शासनाच्या क्रीडा विभागाचे प्रयत्न सुरू असल्याचे मत क्रिडा व युवक सेवा, कोल्हापूर विभागाचे उपसंचालक माणिकराव ठोसरे यांनी व्यक्त केले.