सांगली - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये समाजात माणुसकी कायम असल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत. जाती-धर्माच्या भिंती मोडणारी घटना इस्लामपूरमध्ये पाहायला मिळाली आहे. इस्लामपूर येथील एका हिंदू धर्मातील मराठा समाजातील व्यक्तीच्या मृतदेहावर मुस्लीम समाजाच्या युवक कार्यकर्त्यांनी अंत्यसंस्कार केले.
हेही वाचा- सांगलीच्या कुरळप गावात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; लॉकडाऊनची मागणी
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. इस्लामपूरच्या शिवनगर येथील एका मराठा समाजातील व्यक्तीचा इस्लामपूर कोविड सेंटरमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर नगरपालिकेचे कर्मचारी अत्यसंस्कार करत असतात. मात्र, मुस्लीम बांधवांनी मृतदेह ताब्यात घेऊन इस्लामपूरमधील निनाई नगर ताकारी रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पाडले.
आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो, मग तो समाज कोणताही असो, अशी भावना मुस्लीम युवकांनी व्यक्त केली. हिंदू बांधव हे आपले मोठे भाऊ आहेत, भावाने भावाला मदत केली पाहिजे, या भावनेतून अंत्यसंस्कार करून आपले कर्तव्य पार पाडल्याचे त्यांनी सांगितले. मोहसीन पटवेकर, आसद मोमीन, जोहर जमादार, झिशान पटवेकर, आसीम इबुशे, अवेज इबुशे, आसीम इबुशे, मन्नान मोमीन, सलीम बिजापूरे, ताहीर मोमीन, आयुब जमादार हे कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.