सांगली - जिल्ह्यातील जतच्या नवाळवाडी येथे एका आईने आपल्या दोन चिमुरड्यासंह आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. गावातील एका विहिरीत मुलगा आणि मुलगीसह आईने उडी घेऊन आत्महत्या केली. नवाळवाडी येथील नदाफ वस्तीवर असणाऱ्या मळ्यातील विहिरीत हा प्रकार घडला. बीबीजान इब्राहिम नदाफ ( वय ३५), मुलगी जोया नदाफ (वय ५) मुलगा वसलमान नदाफ ( वय ३) अशी मृतांची नावे आहेत.
बीबीजान नदाफ यांचे माहेर विजापूर आहे. त्यांना विजापूरला जायचे होते. पती इब्राहिम यांनी लॉकडाऊन संपल्यावर जाऊया, असे सांगितले. याच कारणावरून पती-पत्नी यांच्यात किरकोळ वाद झाला होता. पती शेतात गेल्यावर रागाच्या भरात दोन चिमुरड्यांना घेऊन घरापासून २० मिटर अंतरावर असलेल्या विहिरीत उडी घेऊन पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने जत आणि नवाळवाडी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.