सांगली - निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभाव आता पूर्णपणे ओसरला असून राज्यात हळूहळू मान्सून सक्रिय होत आहे. सांगली जिल्ह्यात आज मान्सूनने दमदार एंट्री केली. जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनचा पाऊस पोहचला होता. मात्र, सांगली जिल्हा अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत होता. आज पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात फक्त ढगाळ वातावरण आणि एखाद-दुसऱया ठिकाणी रिमझिम पाऊस पडत होता. मात्र, आज दुपारी सांगली शहर आणि ग्रामीण भागात जोरदार पाऊस पडला. बाकी ठिकाणी पडणारा पाऊस सांगलीतून गायब होता. त्यामुळे शेतकरी वर्गात काहीसे चिंतेचे वातावरण होते.
आज झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या शेतकरी पेरणीपूर्व मशागतींच्या कामांमध्ये व्यस्त असून पेरणीसाठी मोठ्या पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे. गेल्या वर्षी पावसाळा संपताना आलेल्या महापूरामुळे सांगलीतील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या हंगामात मागील नुकसान भरून निघण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यात बहुतांशी ठिकाणी मान्सून सक्रिय झाला आहे. पुढील 5 दिवस राज्यात सर्वत्र पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 18 तारखेपर्यंत सर्वदूर 75 ते 100 टक्केपर्यंत पाऊस पडेल. याच काळात काही ठिकाणी 64.5 मिलिमीटर ते 115.5 मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे.