सांगली - 'सत्तेत बसलेल्या मराठा सरदारांनी आपली सरदारकी वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत योग्य भूमिका मांडली नाही. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले', अशी टीका माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. ते इस्लामपूरमध्ये बोलत होते.
'सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मराठा समाजातील गोरगरीब, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांची प्रगती व्हावी, या उद्देशाने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मुंबई उच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले होते. मात्र, यावर हरकत घेण्यात आली. आता सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले आहे. ठाकरे सरकारने यावेळी आरक्षणाच्या बाजून म्हणावे असे काम केले नाही', असे म्हणत खोत यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मराठा समाजातील नेत्यांवर जोरदार टीका केली.
'जाणीवपूर्वक भक्कम बाजू मांडली नाही'
'मुळात मराठा समाजातील सत्तेमधील सरदारांमुळे आजपर्यंत आरक्षण मिळाले नाही. त्यांच्यामुळे आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. तसेच आरक्षणामुळे गोरगरीब मराठा समाजातील मुले अधिकारी होऊन आपल्या बाजूला बसतील आणि आपल्या सरदारक्या धोक्यात येतील या जाणिवेतून मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सत्तेत बसलेल्या मराठा समाजातील सरदारांनी सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली नाही. त्यामुळे मराठा आरक्षण रद्द झाले आहे', असा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा - आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाज संतप्त; राज्य सरकारवर नागरिकांचा रोष
हेही वाचा - बुधवार पेठेत डबल मर्डर! तडीपार गुंडाकडून पोलिस कर्मचाऱ्याचा खून