सांगली - संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि विनापरवाना सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाचा भंग करुन झरे येथे बैलगाडी शर्यत घेतल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 41 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आटपाडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत.
परवानगी नाकारत शर्यती रोखण्याचे प्रयत्न -
बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी, या मागणीसाठी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी झरे याठिकाणी 20 ऑगस्ट रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. यावरून प्रशासनाने न्यायालयाचे बंदी आदेश शर्यतीला परावनगी नाकारली होती. मात्र आमदार पडळकर यांनी बैलगाडी शर्यत पार पाडणार, अशी भूमिका घेतल्याने प्रशासनाने झरेच्या आसपास 9 गावात संचारबंदी लागू केली. झरे गावच्या वेशीवर नाकेबंदी करत बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली. पडळकर यांनी शर्यतीसाठी तयार केलेले मैदानही उकरून टाकण्यात आले होते.
आणि बैलगाडी शर्यत पडल्या पार -
20 ऑगस्ट रोजी पहाटे आमदार पडळकर समर्थकांनी झरे नजीक असणाऱ्या वाक्षेवाडी याठिकाणी पोलीस प्रशासनाला चकवा देत गनिमीकाव्याने बैलगाडी शर्यती पार पाडल्या. यावेळी मैदानात 7 बैलगाडी जोडी पळवण्यात आल्या. तर यानिमित्ताने हजारो बैलगाडी प्रेमी व पडळकर समर्थक हजर होते. शर्यत झाल्यानंतर याठिकाणी पोलिसांनीही धाव घेतली होती. त्यामुळे पडळकर समर्थक व पोलीस प्रशासन आमने-सामने आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पडळकरांसह 41 जणांवर गुन्हे दाखल -
तर बेकायदेशीर बैलगाडी शर्यत घेतल्याप्रकरणी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी प्रशासनाला गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या होते. त्यानुसार आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांच्या 41 कार्यकर्त्यांवर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. बेकायदा जमाव जमविणे, सर्वाेच्च न्यायलायाच्या आदेशाची पायमल्ली करणे, कोरोनाकाळात आपत्ती व्यवस्थापनाचा नियम भंग करणे तसेच प्राणीजीवन कायद्याअंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.