सांगली - महापालिका क्षेत्रातील वाढती कोरोना रुग्ण संख्या आणि अपुरे पडणारे बेडही बाब चिंतेची ठरत आहे. मात्र, या आपत्कालीन परिस्थितीमध्ये सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन काँग्रेसचे नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेऊन सांगली शहरात 50 बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते या कोविड केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला.
लोकसहभागातून उभे केले कोरोना सेंटर-
सांगली शहरातल्या गणेशनगर येथील रोटरी क्लब याठिकाणी सांगली महापालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक आणि युवक काँग्रेस अध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्या पुढाकारातून 50 बेडचे कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले आहे. लोकसहभागाच्या माध्यमातून या सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी दहा ऑक्सिजन युक्त बेड आहेत. या कोरोना केअर सेंटरचा लोकार्पण सोहळा कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते पार पडला. यावेळी काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. या कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य गरीब रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून लोकसहभागातून या कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली, नक्कीच ही कौतुकास्पद बाब असल्याचे मत मंत्री विश्वजित कदम यांनी यावेळी व्यक्त केले.
याबाबत नगरसेवक मंगेश चव्हाण म्हणाले,आज जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सांगली महापालिका क्षेत्रातील संख्येतही वाढ होता आहे. त्यामुळे हॉस्पिटल अपुरे पडत आहेत, माझ्या प्रभागात दाट लोकवस्ती आणि छोटी-छोटी घरे आहेत. या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून येत आहेत, पण सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांना गृहअलगीकरणात राहणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची ही अडचण आणि गरज ओळखून लोकसहभागातून आपण हे कोरोना केअर सेंटर उभारले आहे. गरजू रुग्णांना मदत आणि सामजिक बांधिलकीच्या जाणीवेतून हे सेंटर सुरू केले असल्याचे यावेळी नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी स्पष्ट केले.