सांगली - नाणार प्रकल्प हा कोकणात होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ असून त्यावरून राजकारण तापवून शिवसेनेचा काही तोटा होणार नाही, असा टोला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नारायण राणे यांना अप्रत्यक्षपणे लगावला आहे. तसेच कोरोना काळातल्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राचे पुढील भविष्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले आहे. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोरोना स्थितीबाबत व्यक्त केले समाधान
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना आढावा बैठक पार पडली. त्यानंतर मंत्री सामंत यांच्याहस्ते मिरजेच्या शासकीय रुग्णालयाला देण्यात येणाऱ्या व्हेंटिलेटरचे वितरण करण्यात आले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मंत्री सामंत यांनी सांगली जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे, ही अत्यंत चांगली बाब असल्याचं मत व्यक्त केलं.
हेही वाचा - 'पेट्रोल पंपावर बिल देताना तुम्हाला 'महागाईचा विकास' दिसेल'; राहुल गांधींची टीका
फक्त दहावीनंतर तंत्र शिक्षणासाठी सीईटी नाही
दहावी नंतर पुढील शिक्षणासाठी तंत्र शिक्षण विभागात प्रवेश देण्याबाबत कालच आपण निर्णय घेतला असून, 10 वीचे गुणपत्रिक आणि प्रमाणपत्रावर कोणत्याही सीईटी परीक्षा न घेता पॉलिटेक्निक विभागात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दुसर्या बाजूला बारावीच्या नंतरच्या व्यवसायिक शिक्षणासाठी सीईटी परीक्षा घेणार आहोत. विद्यार्थ्यांची सुरक्षितता घेऊन तो निर्णय घेतला जाईल. मात्र आज महाराष्ट्रात एक चित्र निर्माण झालं आहे, आम्ही प्रथम वर्ष किंवा अन्य पदवीसाठी कोणतीही सीईटी घेऊ, पण असं कोणतेही राज्य सरकारचे धोरण नाही, बारावीनंतरच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र बघूनच त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात येईल, त्याचबरोबर कोरोना काळातल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रांचा कोणताही परिणाम भविष्यात होणार नाही, याची काळजी राज्य सरकारकडून घेण्यात आल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
नाणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ
नाणार रिफायनरीवरून बोलताना मंत्री सामंत म्हणाले, कोकणात नाणार प्रकल्प होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे नाणार प्रकल्पावरून कोणत्याही प्रकारचं राजकारण तापवून मोठा असा काही फरक पडणार नाही. शिवसेनेलाही कोणता तोटा होणार नाही. याउलट नाणार विभागात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. विशेषतः नाणार बेल्टमध्ये अकराच्या- अकरा ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या आहेत, असा टोला सामंत यांनी अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांना लगावला आहे.
हेही वाचा - स्पीड पोस्टद्वारे पाठवा विसर्जनासाठी अस्थी; वेबकास्टद्वारे पाहा श्राद्ध संस्कार