सांगली - रेमेडिसीवीर इंजेक्शन काळाबाजार करणाऱ्यांवर कडक करवाई करण्यात येईल,असा इशारा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर-पाटील यांनी दिला आहे. ते सांगलीच्या मिरजेत बोलत होते. सध्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाणारे रेमेडिसीवीर इंजेक्शनचा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे.
जे स्टॉकिस्ट आहेत ते साठा करून 5 हजार 400 रुपये किमतीचे इंजेक्शन 8 हजार रुपयाला विकत आहेत, अशा अनेक तक्रारीही येत आहेत. मिरज दौऱ्यावर आलेल्या आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या समोर ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर, त्या बाबत बोलताना रेमेडिसीवीर निर्माण करणाऱ्या आणखी पाच कंपन्या आता आल्या आहेत. त्यामुळे लवकरच सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साठा वाढेल. पण जर कोणी रेमेडिसीवीर इंजेक्शनचा बेकायदेशीर साठा करून काळाबाजार करत असेल तर लवकरात लवकर त्याविरोधात करवाई करण्याचे आदेशही अन्न व औषध प्रशासनाला दिल्याचे आरोग्य मंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी स्पष्ट केले आहे.