सांगली - जिल्हा व शिराळा आरोग्य विभागाने वेळीच चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे हळूहळू कोरोना आटोक्यात येत आहे. ग्रामस्थांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. ते मणदूर येथील आरोग्य केंद्राच्या भेटीत बोलत होते.
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मणदुर (ता. शिराळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जयंत पाटील यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आमदाार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी उपस्थित होते. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, मणदूर कोरोना हाॅटस्पाॅट बनला आहे. ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. लोकांना त्रास होत आहे. पण अजून पंधरा दिवस टाळेबंदीचा कालावधी वाढवावा लागणार आहे. येथे आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून, द्या अशा सूचनाही पाटील यांनी अधिकारी दिल्या आहेत.
मणदूरमधील वाढती रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी अजून कोणकोणत्या योजना कराव्या लागतील, याबाबत मंत्री जयंत पाटील यांनी विविध अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यामध्ये जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुडिलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी व जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळुंखे यांचा समावेश आहे. मणदूर गावात कोरोनाचा शिरकाव ते तालुक्यात सर्वाधिक रुग्णांची कशी वाढली, याची त्यांनी संपूर्ण माहिती घेतली.
मणदूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ एम.आर.परब यांनी आरोग्य यंत्रणा व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी केलेले प्रयत्न याची माहिती दिली. तर आमदार नाईक यांनी डोंगरी भागातील नागरिकांना आरोग्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने कराडला मोठ्या उपचारासाठी जावे लागते, ही समसया सांगितली. त्यासाठी याच भागात चांगल्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात, अशी त्यांनी मागणी केली .
21 दिवसांच्या टाळेबंदीत भात पेरण्यांचे नुकसान झाल्याचे मणदूरचे सरपंच वसंत पाटील यांनी सांगितले. जनावरांचे हाल होत आहेत, अशी खंत व्यक्त केली. तर आमदार मानसिंगराव नाईक यांनी 100 पोती पशुखाद्य दिल्याने थोडा आधार झाला आहे, अशा भावना सरपंच पाटील यांनी व्यक्त केल्या .
यावेळी प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, विराज नाईक, सभापती वैशाली माने, तालुका आरोग्य अधिकारी प्रवीण पाटील, पंचायत समिती सदस्य बी. के. नायकवडी, मनीषा गुरव, सरपंच वसंत पाटील, उपसरपंच विजय चौगुले, आरोग्य अधिकारी एम. आर. परब, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम ,रामचंद नायकवडी, संचालक शिवाजी पाटील व संभाजी पाटील उपस्थित होते.