इस्लामपूर (सांगली) - कर्मवीर शिक्षण संस्थेने दाखविलेले दातृत्व राज्यातील सर्व संस्थांनी स्वीकारले तर कोरोनाचा प्रादुर्भाव थोपविण्यात आरोग्य विभागाला मदत होईल, असे मत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन कोविड सेंटरला प्रदान करताना व्यक्त केले.
कर्मवीर शिक्षण संस्थेने इस्लामपूरच्या कोविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट दिले. डेकाझ या कंपनीचे हे मशीन स्वतः ऑक्सिजन तयार करते. कोरनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा अपुरा पडतो, सिलिंडरमधील ऑक्सिजनच्या पुरवठ्याला मर्यादा येतात, हे ग्रामीण भागात काम करणाऱ्या कर्मवीर शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष डॉ. स्मिता पाटील यांनी ओळखली. त्यानंतर ही मशीन गावागावातील कोविड सेंटरला सेवाभावी संस्थांनी प्रदान करण्याची कल्पना संस्थेचे अध्यक्ष भगवान कदम यांना सुचविले. संस्थेने तात्काळ हे मशीन उपलब्ध करून दिले.
सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा छाया पाटील यांनी जयंत पाटील यांनी हे मशीन कोविड सेंटरला प्रदान करण्याचा आग्रह धरला. मंत्री महोदयांनाही शिक्षण संस्थेने पुढे आणलेला हा उपक्रम स्तुत्य वाटला म्हणून त्यांनी तालुक्यातील सर्व संस्थांनी मानवी आरोग्याच्या संवर्धनासाठी कर्मवीर शिक्षण संस्थेच्या दातृत्वाचा स्वीकार करावा, असे आवाहन केले.
ऑक्सिजन निर्माण करणारे हे मशीन जयंत पाटील यांच्याकडे अध्यक्ष भगवान कदम यांनी सुपूर्त केले व पालक मंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. नरसिंह देशमुख, डॉ. राणोजी शिंदे, व वाळवा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी स्वीकारले.
यावेळी डॉ. प्राजक्ता पाटील, भैरव देव पतसंस्थेचे संस्थापक सुनील पाटील, परीस पाटील, वैभव पाटील, प्राध्यापक संजय पाटील, मुख्याध्यापक हंबीरराव जेडगे, सुदाम राऊत, अतुल कदम, कर्मवीर शिक्षण संस्थेचे सचिव प्राध्यापक अनिल पाटील, उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते संस्थेचे उपाध्यक्ष विलास बारापटे यांनी आभार मानले.