सांगली- जत पूर्व भागातील म्हैसाळ योजनेपासून वंचित असलेल्या गावांना लवकरच म्हैसाळ योजनेत समाविष्ट करण्यासाठी, तसेच पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी वंचित गावांमधील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. चन्नाप्पाणा होर्तिकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जत पूर्व भागातील म्हैसाळ योजनेपासून वंचित असलेल्या प्रत्येक गावातील प्रतिनिधींनी सांगली येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत पुढील आठवड्यात जलसंपदा विभागातील सर्व अधिकारी यांच्यासोबत पूर्व भागातील लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले.
तसेच, जत तालुक्यातील प्रत्येक गावात पाणी गेले पाहिजे व जत तालुक्याचे नंदनवन झाले पाहिजे, असे दिवंगत राजारामबापू पाटील यांचे स्वप्न होते. ते स्वप्न मी सत्यात उतरवणार असल्याची ग्वाही पाटील यांनी जत पूर्व भागातील लोकप्रतिनिधींना दिली, अशी माहिती होर्तिकर यांनी दिली. यावेळी तालुका उपाध्यक्ष फिरोज मुल्ला, सरपंच राजू पाटील, उपसरपंच बाबू नागौड, शिवलिंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा- रयत संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील तर अल्पसंख्याक अध्यक्षपदी मोहसीन पटवेकर