मुंबई - सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे अचानक 25 कोरोना रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडली होती. या सर्व रुग्णांना मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णांपैकी गुरुवारी (दि. 9 एप्रिल) 24 रुग्णांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने मोठे यश मिळाले आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. तसेच रुग्णांवर उपचार करणाऱ्या पथकाचे त्यांनी अभिनंदन केले आहे.
इस्लामपूर येथे अचानकपणे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी गंभीर दखल घेतली होती. सांगली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होऊ नये यादृष्टीने मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या बाधीतांवर तातडीने उपचार करून त्यांना पूर्णपणे बरे करण्याच्या दृष्टीने मुंबईतील ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली याच महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विनायक सावर्डेकर आणि डॉ. प्रशांत होवाळ यांची त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने तातडीने सांगली येथे जाऊन परिस्थितीवर नियंत्रण व उपचाराच्या नियोजनाचे काम 28 मार्च रोजी हाती घेतले होते.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या लक्षात घेता गरज भासल्यास मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे 315 खाटांचे कोरोनाग्रस्त रुग्णालयात तातडीने रुपांतर करण्यात आले होते. याच ठिकाणी सिटीस्कॅन, एम.आर.आय. , लिक्विड ऑक्सिजन, सोनोग्राफी, डायलिसिस व पंधरा खाटांचे अतिदक्षता विभाग सज्ज ठेवण्यात आले होते. याशिवाय कोव्हिड तपासणी केंद्र तातडीने उभारुन ते सुरूही करण्यात आले होते. या रुग्णालयात दाखल झालेले आणखी दोन कोरोनाग्रस्त रुग्णही लवकर बरे होतील आणि सांगली जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त करण्यात आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास डॉ. पल्लवी सापळे यांनी व्यक्त केला आहे. सांगली येथे एकूण 25 कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल करण्यात आले होते. यानंतर यात एका रुग्णांची भर पडली होती. ज्या 24 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यांचे 14 दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार असून त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.
सांगली जिल्हा कोरोनामुक्त करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आपण गाठला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या मोहिमेला विशेष पाठिंबा दिला. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने मार्गदर्शन केले. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी वेळोवेळी महत्वपूर्ण सूचना दिल्या होत्या.
हेही वाचा - मंत्री अमित देशमुखांना कोरोनाची लक्षणे; मुंबईत केली चाचणी