सांगली- पुराखाली आलेल्या पुलाला ओलांडणे एका अतिउत्साही व्यक्तीच्या चांगलेच अंगलट आले आहे. पूल ओलांडताना हा व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली आहे. कडेगाव तालुक्यातील शेळकबाव वांगी येथे हा प्रकार घडला आहे. मात्र सुदैवाने पोहता येत असल्याने हा व्यक्ती बचावला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सांगलीच्या कडेगाव तालुक्यात मुसळधार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे, तालुक्यातील येरळा नदीला पूर आला आहे. या नदीवरील अनेक छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. शेळकबाव वांगी येथील छोटा पूल देखील पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पुलावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत असल्याने कोणाचीही या पुलाला ओलांडण्याची हिम्मत झाली नाही. मात्र एका व्यक्तीने हा पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. पुलाच्या मध्यभागी आल्यानंतर पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने या व्यक्तीला पुढे जाणे अवघड झाले व तो पाण्यात पडला. नंतर त्याने उठून उभे राहूण पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा वेग मोठा असल्याने तो पुन्हा खाली पडला आणि पुलावरुन वाहून गेला.
सुदैवाने त्या व्यक्तीस पोहता येत असल्याने तो दूर पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहत गेला व नदी किनारी लागला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. पुराच्या पाण्यात वाहून जातानाचा सर्व प्रकार कॅमेऱ्या मध्ये कैद झाला आहे. हा व्हिडिओ सांगलीच्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.