सांगली - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. गेल्या 24 तासात शिराळा तालुक्यात 32 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर इतर तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. तर चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने चांदोली धरण 75 टक्के भरले आहे.
सांगली शहरांमध्ये 11 मिलिमीटर इतका पाऊस
गेले काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पावस पडत आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरुपात पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासात शिराळा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. 32 मिलिमीटर इतका पाऊस तालुक्यात पडला आहे, त्यापाठोपाठ दुष्काळी जत तालुक्यामध्ये 15 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सांगली शहरांमध्ये 11 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. तलवारी तर तालुक्यातील कमी-अधिक प्रमाणात पावसाची रिपरिप सुरू आहे.
धरण क्षेत्रात 12 हजार क्युसेक पाण्याची आवक
डोंगरी भाग असणारया शिराळा तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहेत. त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 68 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात 12 हजार क्युसेक पाण्याची आवक झाली असून 34.40 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात सध्या 26.10 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे, त्यामुळे चांदोली धरण 75 टक्के भरले आहे, तर धरणातून सध्या वारणा नदी पात्रात 1, 115 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.