सांगली - प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या पत्नीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. जयश्री बिरूनगी असे या महिला आरोपीचे नाव आहे.
विटा नजिकच्या मोही येथे ११ सप्टेंबर २०१६ रोजी राजेंद्र बिरूनगे (वय - ३०) यांचा खून करून एका झुडपात फेकून देण्यात आला होता. याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. तर यामध्ये मृत राजेंद्र बिरूनगे यांच्या पत्नी जयश्री बिरूनगे यांनी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली होती.
याबाबत तपास केला असता फिर्यादी पत्नी जयश्री बिरूनगे यांनी आपल्या प्रियकराच्या मदतीने पती राजेंद्र बिरूनगे यांचा खून केल्याचे समोर आले. राजेंद्र गोठ्यात झोपले असताना त्यांच्या डोक्यामध्ये फरशी घालून त्यांचा खून करण्यता आला होता.
बिरूनगे यांच्या शेतातील कामगार सुंदर उर्फ महेशकुमार सिंह याच्यासोबत असणाऱ्या अनैतिक संबंधात पती अडसर ठरत आहे. त्यामुळे प्रियकराला तगादा लावून जयश्रीने पतीचा खून केल्याचे निष्पन्न झाले. याबाबत विटा पोलीस ठाण्यात जयश्री बिरूनगे विरोधात पतीच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, आज या खून खटल्याची अंतिम सुनावणी पार पडली. यामध्ये सरकारी पक्षातर्फे १७ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये जयश्री बिरूनगे हे दोषी आढळल्याने सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी जयश्री यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खून खटल्याकामी सरकारी पक्षातर्फे वकील वैशाली मुनचिंटे यांनी काम पाहिले.