नाशिक - जीएसटीच्या परतावा वेळोवेळी सरकारला दिला जात असून तो मिळेल. मात्र, केंद्राने इंधन दर पाच रुपयांनी कमी केले की आपोआप सात रुपयांनी दर कमी होतात. तुम्ही तो दहा बारा रुपयांनी कमी करा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर केदारनाथ ज्योतिर्लिंग येथे आद्य शंकराचार्य समाधी व मुर्तीचे अनावरण झाले. त्यानिमित्त देशासह राज्यात भाजप नेते तीर्थस्थानी जाऊन या उत्सवात सहभागी झाले. त्यानिमित्त भाजप नेते फडणवीस यांनी रविवारी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
जीएसटीबाबत काही समजत नाही ते या मुद्यावर बोलतात हे दुर्देव -
केंद्राकडून जीएसटीचा परतावा दिला जात नसल्याच्या राज्य सरकारच्या आरोपाबाबत विचारले असता ते म्हणाले, ज्यांना जीएसटीबाबत काही समजत नाही ते या मुद्यावर बोलतात हे दुर्देव आहे. जीएसटीऐवजी इंधन दरवाढ कमी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
...तरी तिथे कुठलाही धोका निर्माण होणार नाही -
नैसर्गिक आपत्तींनी चार धाम येथील मंदिरे व परिसराची हानी झाली होती. मोदीजी पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांनी निश्चय केला होता की, या सर्व परिसराचे पुनर्निर्माण करण्यात येईल. त्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने मोठा कार्यक्रम हाती घेत संपूर्ण पुनर्निर्माण निर्माण करण्यात आले आहे. भविष्यात कुठलीही आपत्ती आली तर तिथे कुठलाही धोका निर्माण होणार नाही, अशाप्रकारे त्याठिकाणी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे त्याचा भाविक व पर्यटकांना मोठा लाभ होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.