सांगली - काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वसंतदादा घराण्याची वाट लावली, वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांनी दादांच्या नंतरही त्यांच्या घराण्याची हेळसांड संपवली नाही, असा आरोप महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. औदुंबरमध्ये प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ औदुंबर येथे संपन्न झाला. यावेळी भाजपचे नेते व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह महायुतीचे जिल्ह्यातील आमदार, नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रचार शुभारंभानिमित्त आयोजित सभेत बोलताना सर्वच नेत्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर सडकून टीका केली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी राजू शेट्टींच्या प्रचार सभेच्या दरम्यान काँग्रेसचे माजी खासदार प्रतीक पाटील यांनी आपल्या सोबत येण्याच्या आव्हानाची खिल्ली उडवली आहे. तुम्हीच पक्षातून संन्यास घेतलाय, त्यामुळे तुमच्या बरोबर येऊन मी काय करू, मी पण सन्यास घेऊ का? आणि आता तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून लोक सन्यास घेत असल्याची अवस्था झाल्याचा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला.
तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका करताना पाटील म्हणाले, की राजू शेट्टी यांना सगळे स्वतःलाच हवे असते. लोकसभेसाठी त्यांना जागा मिळत असताना त्यांनी रविकांत तुपकर यांच्यासाठी घेतली नाही. तर सदाभाऊ खोत यांनी शेट्टींचा पक्ष वाढवला त्या सदाभाऊंना मंत्रीपद मिळाल्यानंतरही शेट्टींच्या पोटात दुखत होते. सदाभाऊ यांचे मंत्रीपद शेट्टी यांना पाहावले गेले नाही. त्यामुळे त्यांचा जळफळाट झाला. अशा वृत्तीचा माणूस शेतकऱ्यांचे काय भले करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर येत्या २३ एप्रिलपर्यंत शेट्टींचा शेतकरी कळवळ्याचा बुरखा आपण हटवणार असल्याचे आव्हानही त्यांनी दिले.