सांगली - एक्झिट पोलमुळे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांनी घाबरून जाऊ नये, ३०० जागा निवडून येतील अशी मोदींची लाट कुठे दिसली नाही, आणि राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीच्या १८ ते २२ जागा निवडून यायला हव्यात, जर येत नसतील तर निवडणूक प्रक्रियबाबतीत पुन्हा एकदा संशोधन करावे लागेल, असे मत जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या एक्झिट पोलवरून जयंतराव पाटील यांनी आज सांगलीमध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. जयंत पाटील यांनी थेट निवडणुक आयोगाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. मागील अनुभव पाहता एक्झिट पोल आणि लागलेला निकाल हे पाहिले तर प्रत्यक्ष असे रिझल्ट लागलेले नाहीत.
लाट निर्माण करून ३०० जागा विजयी होतील, अशी काही लाट मोदींची दिसून आली नाही, असे मत पाटील यांनी व्यक्त करत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आघाडीला १८ ते २२ च्या दरम्यान जागा यायला हव्या, जर असे झाले नाही, तर निवडणूक प्रक्रियेवर पुन्हा एकदा संशोधन झाले पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. मतमोजणी केंद्रात विरोधी पक्षाचे प्रतिनिधी नक्कीच व्हीव्हीपॅट मधील मते मोजण्याबाबत आग्रह करतील असेही ते म्हणाले. याबरोबर एक्झिट पोलनंतर भाजपकडून विजयाचा आनंद व्यक्त केला जात असला तरी एक्झिट पोलमध्ये विरोधक हारलेत या भ्रमात देशाची जनता कदापि राहणार नाही, मत मोजणीच्या निकालानंतर सर्व कळेल, असा विश्वास जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.