सांगली - यंदा सांगली जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती अजिबात जाणवत नाही. विशेषतः "दुष्काळी"असा कलंक असणारा जत यंदा पाण्याच्या टंचाईपासून मुक्त झाला आहे की काय? असा प्रश्न पडला आहे. कारण मे महिना संपत आला आहे आणि यंदा तालुक्यात अवघे ६ टँकर सुरू आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात तब्बल १०९ टँकर सुरू होते. मात्र, यंदा हे चित्र जवळपास संपुष्टात आले आहे. कोणाच्या मते परतीचा झालेले पाऊस, म्हैसाळ योजनेचे पोहचलेले पाणी तर कोणाच्या मते कोरोनाच्या मानसिकतेमुळे जनतेचा पाण्यापासून लक्ष विचलित झाले, तर प्रशासनाचेही दुर्लक्ष झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई संपली की? यंत्रणेने कोरोनाच्या आड ती संपवली! असा आता प्रश्न निर्माण झाला आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाची स्थिती कायम आहे. मात्र या स्थितीशी लढताना प्रशासनाला दुष्काळाशीही दोन हात करावे लागणार, असे वाटत होते. मात्र, यंदा तसे काही घडताना प्रशासकीय पातळीवर दिसून येत नाही. कारण गेल्या वर्षी पाणी टंचाईशी झुंजणाऱ्या सांगली जिल्ह्यात आज हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच गावात पाण्याची टंचाई समोर आली आहे. विशेषत: जत तालुक्यात आज पाण्याची टंचाई जणू गायब झाली आहे का? असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या परिस्थितीची कारणे वेगवेगळ्या पद्धतीने देण्यात येत आहेत.
वास्तविक जिल्ह्यात नव्हे तर राज्यात सांगली जिल्ह्यातील जत हा तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. वर्षानुवर्षे याठिकाणी पाण्यासाठी संघर्ष राहिला आहे. दरवर्षी पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असते. घागरभर पाण्यासाठी इथल्या नागरिकांना वणवण भटकावे लागते. पाण्याचा टँकर आला की गावागावात पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष सुद्धा होतो, तर पोटाचे चिमटे काढून पाणी विकत घ्यावे लागते, अशी या तालुक्यातील भीषण वास्तविकता आहे. मात्र, यंदा उन्हाळा संपत आला तरी यातील कोणत्याच गोष्टी तालुक्यात पाहायला मिळाल्या नाहीत.
कोरोनाच्या स्थितीत या सर्व गोष्टी दबल्या गेल्या, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांचा आहे. गेल्यावर्षी परतीचा पाऊस उशिरा पडला आणि तो जोरदार पडला. त्यामुळे दुष्काळाची स्थिती जाणवत नाही, असे तालुक्यातील पाणी चळवळीतील नेत्यांचे मत आहे. प्रशासन मात्र यावर फारसे काही बोलत नाही. फक्त ज्या गावात टँकरची मागणी येईल त्याठिकाणी पाण्याचा टँकर देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
२०१९ मे अखेरची जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती -
जिल्ह्यातील 181 गावातील 1 हजार 136 वाड्या-वस्त्यांना 188 टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात आला होता .
3 लाख, 76 हजार, 965 बाधित लोकसंख्येला व 51 हजार 135 पशुधनांना पाणी पुरवठा करण्यात आला होता.
यासाठी जिल्ह्यात एकूण 96 खासगी विहिरी/कूपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या होत्या.
यामध्ये जत आणि खानापूर तालुकयात दुष्काळाची अधिक तीव्रता पाहायला मिळाली होती.
एक नजर दुष्काळी "जत"ची २०१९ मे अखेरची स्थिती
जत तालुक्यातील 123 गावांपैकी 92 गावे टंचाईग्रस्त होती.
तर तालुक्यातील 671 वाड्यांमधील 2 लाख 23 हजार 131 ही बाधित लोकसंख्या होती.
सर्वाधिक 109 टँकर्सद्वारे तालुक्यात पाणी पुरवठा करण्यात आला होता.
अशी भीषण पाण्याची टंचाई गेल्या वर्षी जिल्ह्यात आणि विशेषत: जत तालुक्यात होती. मात्र, सध्या एकट्या जत तालुक्यात मे महिना संपत आला असताना केवळ ६ टँकर सुरू आहेत, तर २ ठिकाणी टँकरची मागणी आहे, अशी माहिती जत तालुक्याचे तहसीलदार यांनी दिली आहे. पूर्व भागातील ७ गावांमध्ये ही पाणी टंचाई निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे.
एक नजर जत तालुक्यातील मे २०२० मधील सध्याची स्थिती -
७ गावात ६ टँकर द्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.
तालुक्यात एकूण ३७ तलाव आहेत.
पैकी १८ तलाव सध्या कोरडे पडले आहे.
पूर्व भागातील अनेक गावातील कूपनलिका, विहिरीही कोरड्या पडल्या आहेत.
आता यावरून जत तालुक्यातील सामाजिक संघटनांमधून वेगवेगळे मतंमतांतरे समोर येत आहेत. जिल्ह्यातील कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पूर्ण दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केला आहे. कोरोनाच्या नावाखाली पाण्याचे टँकरची मागणी असताना देखील पाणी टँकर देण्यात येत नाही, असा आरोप ढोणे यांनी केला. तसेच कोरोना आहे, म्हणून पाणी लागत नाही का? असा सवालही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर दरवर्षी शेकडो टॅंकरची मागणी असते. मग यावर्षी असे काय झाले. खरंच पाण्याची उपलब्धता झाली आहे का ? प्रशासनाने उत्तर दिले पाहिजे, असे आवाहन करत कोरोनाच्या नावाखाली दुष्काळग्रस्तांची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप ढोणे यांनी केला आहे.
६४ गावांच्या पाणी प्रश्नावर आंदोलन करणारे तुकाराम महाराज यांनी दरवर्षीं जेवढी टंचाई असते तेवढी तीव्र नसली तरी तालुक्यातील पाणी टंचाई संपली नाही. मात्र ती कोरोनाच्या परस्थितीमुळे पुढे येऊ शकली नाही, असे मत व्यक्त केले आहे. कारण दुष्काळग्रस्त जनता ही कोरोनाच्या मानसिकतेत अडकून पडली आहे. त्यामुळे पाण्यापासून यावेळी लक्ष विचलित झाले आहे. तसेच यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनावर पाण्यासाठी अवलंबून न राहता लोक आप-आपल्या पातळीवर पाण्याची व्यवस्था करत आहेत. त्यामुळे पाणी टंचाई नसल्याची परिस्थिती भासवली जात आहे पण आजही पाण्यापासून वंचित असणाऱ्या ६४ गावांपैकी ३०-३५ गावे पाणी टंचाईच्या चक्रात आहेत. पण कोरोनाच्या स्थितीमुळे याबाबत आंदोलनाच्या माध्यमातून आवाज सुद्धा उठवता येत नाही, असे मत तुकाराम महाराज यांनी व्यक्त केले आहे.
काही स्थानिक नेत्यांच्या मते गेल्यावर्षी परतीचा पाऊस हा जत तालुक्यात उशिरा आणि समाधानकारक झाला आहे. गेल्यावर्षी जत तालुक्यातील पूर्व भागात अतिवृष्टी झाली आहे. १५ वर्षात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता, तर जलयुक्त शिवार योजनेतून झालेली कामे याचा परिणाम तालुक्यात यंदा दिसत आहे. शिवाय काही भागात म्हैसाळ सिंचन योजेनचे पाणी सुद्धा पोहोचले आहे. यामुळे यावर्षी पाण्याची तीव्र टंचाई जाणवत नाही. काही गावात मात्र पाणी टंचाई आहे. पण दरवर्षी जशी परिस्थिती असते तशी यंदा आजिबात नसल्याचे उमदीचे पाणी संघर्ष चळवळीचे नेते सुनील पोतदार यांचे मत आहे.
एकूणच जत तालुक्यात यंदा पाणी टंचाई आहे. मात्र, ती कोरोनाच्या स्थितीमुळे फारशी जाणवत नाही, असा आरोप होत आहे. काही सामाजिक संघटना यंदा गतवर्षी झालेली अतिवृष्टी, सिंचन योजनांची झालेली कामे याचा परिणाम पाणी टंचाई नसल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे, तर प्रशासन मात्र पाणी टँकरची मागणी नसल्याचे कारण पुढे करत आहे. ज्यावेळी येईल त्यावेळी देऊ, अशी भूमिका स्पष्ट करत आहेत. मात्र या त्रांगड स्थितीमुळे आज दुष्काळी जत तालुका पाणी टंचाईपासून मुक्त झाला आहे! अशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. मात्र, परिस्थिती अजून बदलली नाही, हे वास्तव आहे.