सांगली - जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्समध्ये कलेचे धडे गिरवणाऱ्या इस्लामपूरच्या तीन तरुणांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनवण्याचा संकल्प केला आहे. शंभरहून अधिक मूर्ती तयार झाल्या असून लोकांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आदर्श फारने, प्रतिक शिंदे, सौरभ कांबळे अशी या तीन कलाकारांची नावे आहेत.
आदर्श हा जेजेमध्ये शिल्पकलेचे शिक्षण घेतो, तर प्रतीक हा जे जे मध्ये जाहिरातीचे शिक्षण घेत आहे. सौरभ कांबळे महाविद्यालयात शिक्षक आहे. कलेची आवड असणाऱ्या या तिघांनी एकत्र येत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याचा संकल्प केला. विसर्जनानंतर पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीपासून लोकांचे प्रबोधन व्हावे, या हेतूने त्यांनी हे काम हाती घेतले आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे लोकांनी गर्दी करू नये अशा सूचना आहेत. शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या मूर्ती गणेश विसर्जनावेळी घरातील कुंडीत किंवा बादलीत विसर्जन करून त्या मातीत बियांचे रोपण करावे, असे या तरूणांचे मत आहे. त्यांनी कुशलतेने मूर्तीतील बारकावे त्यांनी कोरले आहेत तर, काही मूर्ती, साच्याशिवय हाताने घडवल्या आहेत.
आदर्श, प्रतिक आणि सौरभ यांच्याकडे ३०० रुपयांपासून ११०० रुपयांपर्यंत मूर्ती आहेत. घरगुती मूर्ती प्रतिष्ठापणेसाठी लोकांनी या मूर्तींना प्राधान्य दिले आहे.