सांगली - शिराळा तालुक्यातील निगडीमध्ये मुंबईहून आलेल्या, कोरोनाग्रस्त तरुणीवर इस्लामपूरमधील एका रुग्णालयात उपचार झाल्याचे समोर आला आहे. त्यामुळे आता खबरदारी म्हणून, इस्लामपूर नगरपालिकेने पुन्हा एकदा इस्लामपूर शहर तीन दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. २७ ते २९ एप्रिल पर्यंत इस्लामपूर शहर तिसऱ्यांदा कडकडीत बंद राहणार आहे.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहर आता तिसऱ्यांदा पूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे. शिराळा तालुक्यातील निगडी येथील कोरोनाबाधीत तरुणीवर शहरातील एका रुग्णालयात उपचार करण्यात आल्याचं समोर आले आहे. सदर तरुणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यानंतर तो दवाखानाही सील करण्यात आला आहे. मात्र, खबरदारीच्या उपाययोजना म्हणून नगरपालिका प्रशासनाने इस्लामपूर शहर पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. २७, २८ आणि २९ एप्रिल हे तीन दिवस इस्लामपूर शहर पुन्हा १०० टक्के लॉकडाऊन ठेवण्यात आले आहे. याआधी पहिल्यांदा इस्लामपूरमधील २६ कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.
त्यांनतर दुसऱ्यांदा वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथील एका मुंबई स्थित व्यक्तीला कोरोना लागण झाल्याचे समोर आले होते,आणि तो व्यक्ती कुटुंबासहित गावी राहिला होता. शहरापासून जवळच हे गाव असल्याने या पार्श्वभूमीवर तीन दिवस लॉकडाउन करण्यात आले होते. शिराळा तालुक्यातील निगडी येथे मुंबईहुन आलेली तरुणी कोरोना बाधित आढळले,तर या तरुणीवर रिपोर्ट येण्याआधी इस्लामपूरमधील एक रुग्णालयात तपासणी करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यामुळे इस्लामपूर नगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा इस्लामपूर शहर तीन दिवसांसाठी कडकडीत लॉकडाऊन निर्णय घेतला आहे.