सांगली - महापालिका क्षेत्रातल्या खाजगी कोविड हॉस्पिटलमधील डेथ ऑडीटची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच, याबाबत प्रशासनाकडून काही प्रयत्न झाले नाहीत तर, उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी जनहीत याचिका दाखल करण्याचा इशारा, संघटनेचे नेते महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे.
87 रुग्णांच्या मृत्युला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मिरजेतील अपेक्स केअर हॉस्पिटलच्या डॉक्टर महेश जाधव यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. या मुद्द्यावरून सांगली महापालिका क्षेत्रातल्या खाजगी रुग्णालयात झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत संघर्ष सफाई कर्मचारी व असंघटित कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष महेश कुमार कांबळे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. यामध्ये कांबळे यांनी महापालिका क्षेत्रातल्या सर्व खाजगी रुग्णालयात झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.
'अन्यथा उच्च न्यायालयात याचिका'
15 जुलैपर्यंत ज्या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत, त्या ठिकाणाचे सीआयडीमार्फत डेथ ऑडिट करून संबंधित हॉस्पिटलवर डॉक्टरांच्यावरही कारवाईची मागणी केली आहे. तसेच, प्रशासनाकडून याबाबत जर कोणतीही भूमिका घेण्यात आली नाही, तर उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार, असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी संघटनेचे शरद सातपुते व पदाधिकारी उपस्थित होते.